भारतासह अनेक देशात इंटरनेट व्यवस्थेत व्यत्यय : लाल समुद्रात फायबर ऑप्टिक केबल तुटली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंटरनेटसाठी समुद्राखाली टाकलेली केबल तुटल्यामुळे भारतासह अनेक आशियाई देशांमध्ये इंटरनेटवर परिणाम झाला आहे. ही केबल लाल समुद्राच्या खाली आहे. पाण्यातील केबल कापल्यामुळे रविवारी अनेक भागात इंटरनेटचा वेग प्रभावित झाला. यामध्ये भारतासह आशियाचा बहुतांश भाग समाविष्ट असल्याची माहिती ‘नेटब्लॉक्स’ने रविवारी दिली. मायक्रोसॉफ्टनेही एका स्टेटस वेबसाईटद्वारे ही माहिती दिली आहे. केबल का कापण्यात आल्या हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. मात्र, अधिकारी नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
समुद्रतळाशी असलेल्या खराब झालेल्या केबल्समध्ये सी-कॉमसह महत्त्वाच्या सिस्टीमचा समावेश आहे. अशा परिस्थितीत या केबल्सच्या नुकसानीमुळे, जगभरातील 17 टक्के इंटरनेट व्यवस्था विस्कळीत झाली आहे. येमेनचे हुथी बंडखोर या केबल्सना लक्ष्य करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इस्रायलवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे. ते गाझामधील हमासविरुद्धचे युद्ध संपवण्यासाठी हे दबावतंत्र आखत आहेत. मात्र, हुथी बंडखोरांनी यापूर्वीही केबल्सवर हल्ला केल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे.
दुरुस्तीसाठी विलंब शक्य
लाल समुद्राच्या आत टाकलेल्या फायबर ऑप्टिक केबल्सना नुकसान झाल्यामुळे इंटरनेटची गती मंदावली आहे. फायबर ऑप्टिक केबल्सच्या नुकसानीमुळे जगभरात इंटरनेटचा वेग मंदावल्यामुळे वापरकर्त्यांना संथ इंटरनेट स्पीडचा सामना करावा लागू शकतो असे स्पष्ट करतानाच या केबल्सच्या दुरुस्तीसाठी वेळ लागू शकतो असे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.
‘नेटब्लॉक्स’चे स्पष्टीकरण
इंटरनेट अॅक्सेसवर लक्ष ठेवणाऱ्या ‘नेटब्लॉक्स’ने याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. लाल समुद्रात केबल खंडित झाल्यामुळे अनेक देशांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी बिघडली आहे. युरोप आणि आशिया दरम्यान इंटरनेट स्पीड देखील खूप मंद झाला आहे. लाल समुद्रातील केबल्स जगभरातील इंटरनेट अॅक्सेससाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आशिया आणि युरोपमधील इंटरनेटचा एक मोठा भाग या केबल्सशी जोडलेला असल्याचेही सांगण्यात आले.









