बालहक्क संरक्षण आयोगाच्या सर्वेक्षणात उघड : बेळगाव, बेंगळूर, चामराजनगर, रायचूर-चिक्कमंगळूरमध्ये सर्वेक्षण
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहरातील 8 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचा स्क्रिन टाईम वाढला असून त्यांच्याकडून इंटरनेटचा गैरवापर होत आहे. काही मुलांना लैंगिक दृष्य बघण्याची चटक लागली असून अनोळखी व्यक्तींसोबत आपले वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची सवयही त्यांना लागली आहे. पालकांना पत्ता नसताना त्यांनी आपला सर्व तपशील अनोळखी व्यक्तीला ऑनलाईनद्वारे पाठविला आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
कर्नाटक स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स (केएससीपीसीआर) म्हणजेच बालहक्क संरक्षण आयोगाने केलेल्या अभ्यास सर्वेक्षणाअंती ही बाब उघड झाली आहे. बेळगावबरोबरच बेंगळूर, चामराजनगर, रायचूर व चिक्कमंगळूर या चार जिल्ह्यांमध्येही हे सर्वेक्षण एकाच वेळी करण्यात आले. या संबंधीचा अहवाल विधानपरिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी नुकताच सादर केला.
सर्वेक्षणानुसार या पाच जिल्ह्यांतील 903 मुलांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातील सहा शाळांतील 30 विद्यार्थ्यांची निवड या अभ्यासासाठी करण्यात आली होती. निष्कर्षानुसार 8 ते 11, 12 ते 14 व 15 ते 18 वयोगटातील ही मुले ऑनलाईन पद्धतीने परक्या माणसाच्या संपर्कात आली आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी आपली सर्व माहिती त्यांना दिली असून काही ठिकाणी मुले त्या व्यक्तीला भेटण्यासाठीसुद्धा गेली आहेत. खेदजनक बाब म्हणजे यातील 12 टक्के मुले ही ग्रामीण भागातील व 9 टक्के मुले शहरी भागातील आहेत. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे 1 टक्का मुलांनी आपले वैयक्तिक खासगी फोटो आणि व्हिडिओसुद्धा संबंधित व्यक्तीला पाठविले असून 7 टक्के मुलांनी आपली सर्व माहिती त्यांना दिली आहे.
या अहवालामुळे राज्यामध्ये जिल्हास्तरावर हेल्पलाईन सुरू करणे, मुलांसाठी समुपदेशनाची सोय करणे, पुनर्वसनाची सोय करणे यासंबंधी पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते व शिक्षकांना प्रशिक्षण देणे, तसेच राज्यस्तरावर टास्क फोर्सची स्थापना करणे, याची गरज अधोरेखित झाली आहे. या कारणास्तव मुलांनी ऑनलाईनद्वारे चॅटिंग केले आहे. यापैकी 70 टक्के मुलांनी आपली सर्व माहिती परक्या व्यक्तीला दिली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे 34 टक्के पालकांनी यासंबंधी पोलिसांमध्ये तक्रार करण्यास पुढाकार घेतला आहे पण अन्य पालकांनी नंबर ब्लॉक करणे किंवा संभाषण नष्ट करणे, यावर भर दिला आहे.
कारनामे…
15 ते 18 वयोगटातील मुलांचे परक्या व्यक्तीशी ऑनलाईनद्वारे संपर्कात असणे.
30 टक्के सोशल मीडियाचे फॉलोअर्स वाढण्यासाठी
27 टक्के अज्ञात राहून नातेसंबंध जोडणे
यापैकी 47 टक्के मैत्रीसाठी









