20 वर्षांपूर्वी भारतामध्ये काही ठरावीकच क्षेत्रांना प्राधान्य दिले जायचे, ते म्हणजे वैद्यकीय, अभियांत्रिकी, सरकारी नोकऱया किंवा वित्त. त्या व्यतिरिक्त कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी किंवा व्यवसाय करणे हे सामाजिक दृष्टिकोनाने एकप्रकारे कमी पणाचे मानले जात होते. पालक विद्यार्थ्यांना विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील शिक्षण निवडण्यास भाग पाडत असत. हे देखील खरं आहे की त्या काळात इतर क्षेत्रांमधील नोकरीची शाश्वती कमी असायची आणि म्हणूनच यश प्राप्तीची खात्री नसायची. त्यामुळे कुटुंबाच्या आणि स्वतःच्या सुखी आणि सुरक्षित जीवनासाठी मुलामुलींना आपल्या इच्छा बाजूला ठेवून नावडत्या क्षेत्रांमध्ये नोकरी किंवा व्यवसाय करावा लागायचा.
पण स्मार्टफोन आल्यापासून या परिस्थितीत झपाटय़ाने बदल झाला आहे. स्मार्टफोनवर कोणत्याही प्रकारची माहिती सहज उपलब्ध असल्याने लोकांना विविध क्षेत्रांची माहिती सहजपणे मिळू लागली. या यंत्राच्या उदयामुळे एक नवीन आणि विकसित ऑनलाईन समुदाय तयार झाला. पूर्वी मर्यादित ठिकाणी असलेली माहिती आणि साधने सहजपणे कोणीही स्मार्टफोनवर मिळवू शकतो. या तंत्रज्ञानाने केवळ तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती केली नाही, तर समाजासाठी एक नवीन व्यासपीठही निर्माण केले आहे. यातून फेसबुक, यूटय़ूब, वॉट्सअप, इन्स्टाग्राम इत्यादीसारखे जागतिक स्तरावर वापरले जाणारे सामाजिक व्यासपीठ निर्माण झाले.
माणूस नेहमी प्रत्येक परिस्थितीत सर्वोत्तम बनण्याचा मार्ग शोधतो. त्याने या माध्यमांचे संभाव्य फायदे ओळखले आणि आपली कौशल्ये बाजारात आणण्यासाठी त्यांचा वापर करण्यास सुरुवात केली. एकेकाळी फक्त सिनेमा आणि गाणी ऐकण्यासाठी वापरल्या जाणाऱया यूटय़ूब नावाच्या ऍपवर आता जो तो स्वतःचे मजकूर अपलोड करू लागला. एवढच नव्हे तर ते मजकूर जगभर पसरूदेखील लागले.
ही संधी साधून जाहिरात व्यावसायिकांनी त्या मजकुरावर त्यांच्या जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी या माणसांना मानधन देणेसुद्धा सुरू केले. बघता बघता हा व्यवसाय एवढा वाढला की माणसांना घरबसल्या लाखो रुपये मिळू लागले.
इंस्टाग्राम हे ऑनलाईन व्यासपीठ तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय आहे. या व्यासपीठावर कोणीही चित्र आणि व्हीडिओ टाकू शकतो. सामान्य माणसांबरोबर मोठमोठे कलाकार, खेळाडू आणि नेतेसुद्धा या ऍपचा वापर करतात. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःची व स्वतःच्या कामाची जाहिरात करायची संधी या ठिकाणी मिळाली आहे.
पण मग बरेच लोक असाही विचार करतात की या क्षेत्रामध्ये कोणतेही कष्ट लागत नाहीत आणि ही सगळी व्यासपीठं फक्त मनोरंजनाचे एक साधन आहे. या व्यासपीठांची सुरुवात जरी मनोरंजनासाठी झाली असली तरी हे क्षेत्र आता इतके विकसित झाले आहे की यामधून मानधन कमवून कित्येकजण एक आरामदायी जीवन जगू शकतात. पण इंटरनेट आणि ऍप्सच्या माध्यमातून पैसे कसे कमावले जातात हे अजून बऱयाच लोकांना नीट माहिती नाही. त्यामुळे प्रयत्न करूनसुद्धा काही जणांना हवी तेवढी प्रसिद्धी मिळत नाही. जर एखाद्याला ऑनलाइन मजकूर तयार करून त्यातून मानधन मिळवायचे असेल तर सर्वप्रथम समाजाचे मानसशास्त्र समजून घेतले पाहिजे. जागतिक, वैज्ञानिक, सामाजिक, राजकीय, तांत्रिक इत्यादी क्षेत्रांमध्ये काय चालले आहे, त्याचा परिणाम लोकांचा मनावर आणि जीवनशैलीवर कोणत्या पद्धतीने होत आहे, या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. माणसाला अशी सामग्री आवडते ज्यामध्ये त्याला भावनिक संबंध सापडतो. त्यामुळे आपल्या सर्जनशील कल्पनांना समाजाच्या बदलत्या मानसिकतेशी जुळवून घेणे आवश्यक आहे.
आता या सगळय़ा गोष्टींचा विचार केल्यावर मजकूर या व्यासपीठांवर टाकला की त्याची योग्य जाहिरात करणे आवश्यक आहे. त्यासाठी ठरावीक साधनांचा वापर केला जातो. प्रथम म्हणजे योग्य भाषेचा वापर. प्रत्येक व्हीडिओ किंवा चित्राच्या मजकुरानुसार त्यासाठी लिहिली जाणारी भाषा बदलते. त्यानंतर हॅशटॅग नावाच्या एका साधनाचा वापर केला जातो. तुम्ही बनवलेल्या मजकुराचे विषय ज्या लोकांना आवडतात आणि जे लोक या प्रकारचा मजकूर इंटरनेटवर शोधतात त्यांची माहिती गोळा करणे म्हणजे हॅशटॅग. योग्य मजकुराला योग्य हॅशटॅग वापरले तरच तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकतो. आता या सर्व साधनांचा वापर करून जेव्हा तुम्ही ऑनलाईन प्रसिद्धी मिळवता तेव्हा जाहिरात कंपन्या तुमच्याकडे येतात. जर त्यांना वाटले की तुमच्याद्वारे ते त्यांचे उत्पादन लोकांपर्यंत पोहोचू शकतील तर ते तुम्हाला प्रायोजकत्व देतात. म्हणजेच, त्यांचे उत्पादन जर तुम्ही तुमच्या चित्रात किंवा व्हीडिओमध्ये वापरले तर ते तुम्हाला पैसे देतात.
आपल्या ऑनलाईन मजकुराद्वारे पैसे कमावण्याची दुसरी पद्धत म्हणजे तुमच्या मजकुराआधी येणाऱया जाहिराती. तुमचा मजकूर जर लोकांमध्ये खूप प्रसिद्ध असेल आणि खूप लोक जर ते बघत असतील तर जाहिरात कंपन्या तुमच्या मजकुराआधी त्यांच्या जाहिराती लावतात. तुमच्या मजकुरावर त्यांच्या जाहिराती लावण्याची परवानगी दिल्याबद्दलदेखील तुम्हाला पैसे मिळतात. तुमची ऑनलाईन प्रसिद्धी किती आहे त्यावर तुम्हाला मिळणारी रक्कम ठरते. हे ऐकताना खूप साधे सोपे वाटते. पण कधी न भेटलेल्या माणसांना इंटरनेटद्वारे प्रभावित करणे आणि करत राहणे इतके सोपे नाही. जर तुम्हाला लोकांचे लक्ष तुमच्याकडे आकर्षित करायचे असेल तर तुम्हाला नवनवीन साधनांचा वापर करून सतत आपला मजकूर विकसित करीत राहिले पाहिजे. तुम्हाला जगासमोर एक प्रभावशाली प्रतिमा निर्माण करावी लागते. त्याचबरोबर तुमचे मन कणखर बनवले पाहिजे कारण ज्याप्रमाणे तुम्हाला प्रशंसा मिळेल, त्याचप्रमाणे तुम्हाला लोकांच्या नकारात्मक टीकांचासुद्धा सामना करावा लागेल. झपाटय़ाने बदलत्या जगात आपले सामाजिक स्थान टिकवून ठेवण्यामागे खूप तर्क लावावे लागतात. इंटरनेटचे जग निर्दयी आहे.
जर तुम्ही एक चूक केली तर तुम्ही कायमचे हद्दपार होऊ शकता. त्यामुळे जरी या क्षेत्रातून मोठ मोठी वैज्ञानिक क्रांती घडत नसली तरी समाज घडवण्यामागे किंवा तोडण्यामध्ये या क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे.
कित्येक तरुण आज या क्षेत्राद्वारे आपले मानधन कमवतात. या क्षेत्रामध्ये अनेक धोकेदेखील आहेत पण ते कोणत्या क्षेत्रामध्ये नाहीत? या क्षेत्राचा योग्य वापर केला आणि क्रांतिकारक अनेक सकारात्मक मजकूर जर लोकांपर्यंत पोचवला तर एक प्रगत समाज आपण नक्कीच निर्माण करू शकू. हा व्यवसाय अजून लोकांच्या मनामध्ये रुजायला वेळ लागेल, पण तो नक्कीच प्रत्येकाच्या भविष्याचा एक मोठा भाग असणार आहे!
-श्राव्या माधव कुलकर्णी








