‘तरुण भारत’ वृत्ताची दखल, नागरिकांतून समाधान
बेळगाव : शहरात बेकायदा इंटरनेट केबलचे जाळे पसरत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे वृत्त ‘तरुण भारत’ मधून प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत शास्त्रीनगर येथील इंटरनेट केबल बुधवारी हटविण्यात आल्या. यामुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. यापूर्वी केवळ टेलिव्हिजन प्रोव्हायडर कंपन्यांच्या केबल ओढल्या जात होत्या. परंतु सध्या प्रत्येक इंटरनेट प्रोव्हायडर कंपन्यांच्या स्वतंत्र केबल ओढल्या जात आहेत. हेस्कॉमच्या विद्युत खांबावरुन यातील बऱ्याचशा केबल विनापरवाना ओढण्यात आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. परंतु कोणत्याच विभागाकडून केबल चालकांवर कारवाई झाली नव्हती. काही ठिकाणी या केबल लोंबकळत असल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शास्त्रीनगर तिसरा क्रॉस येथे तर तब्बल 30 हून अधिक केबल ओढण्यात आल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होत होती. कोणतेही मोठे साहित्य ने-आण करताना अथवा गणेशोत्सवाच्या वेळी गणेशमूर्ती केबलला लागल्याने धोका निर्माण होत होता. त्यामुळे या केबल्स हटविण्याची मागणी करण्यात आली. ‘तरुण भारत’मधून बेकायदा केबल्सचे वृत्त प्रसिद्ध करताच बुधवारी त्या हटविण्यात आल्या. यामुळे बऱ्याच दिवसांनी या परिसराने मोकळा श्वास घेतला.









