शेरा-पंजाब व मिर्झा इराण यांच्यात प्रमुख लढत, 80 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन
बेळगाव : येळ्ळूर येथे येळ्ळूर कुस्तीगीर संघटना आयोजित कलमेश्वर, श्री चांगळेश्वरी व महालक्ष्मी देवीच्या वाढदिवसानिमित्त लोकमान्य को-ऑप. सोसायटी पुरस्कृत आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन गुरुवार दि. 24 रोजी येळ्ळूर महाराष्ट्र मैदानात आयोजित करण्यात आले आहे. भारताचा अव्वल मल्ल महानभारत केसरी शेरा-पंजाब व इराणचा आंतरराष्ट्रीय मल्ल मिर्झा इराण यांच्यात प्रथमच बेळगावात कुस्ती होणार आहे, अशी माहिती येळ्ळूर कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष प्रदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती दिली. या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष भोला पाखरे, दौलत कुगजी, सचिव दीपक कर्लेकर, खजिनदार दुद्दाप्पा बागेवाडी, सतिश कुगजी, हणमंत पाटील, विलास नंदी, मोहन कुगजी, श्रीधर कानसिडे, अनंत कुंडेकर, यल्लाप्पा पाटील व राजू दोड्याण्णावर उपस्थित होते. प्रदीप देसाई म्हणाले, भारतात सर्व मल्लांची झुंझ देवून अपराजित राहिलेला शेरा-पंजाब हा मल्ल प्रथमच बेळगावात महाराष्ट्र मैदान येळ्ळूर येथे येत आहे.
तर त्याला लढत देणारा इराणचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मल्ल मिर्झा इराण हा देखील या मैदानात प्रथमच येणार आहे. मिर्झा इराणनेही भारतातील सर्व मल्लांशी लढत देत विजयी परंपरा कायम राखली आहे. या मैदानात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती रुस्तुमे हिंद व डबल महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व भारत केसरी अमिन बेमीया-जम्मू काश्मिर यांच्यात होईल. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन-पुणेचा शिवा महाराष्ट्र उर्फ रवी चव्हाण वि. भारत केसरी-हरियाणाचा रोहीत सम्चनिया यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती युपी केसरी राजू मलांगा-हरियाणा व डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे यांच्यात होणार आहे.
या शिवाय लहान मोठ्या 80 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी जवळपास 50 हजारांहून अधिक कुस्ती शौकिनांच्या बसण्याची सोय करण्यात आली असून मैदानातही स्क्रीनची व्यवस्थाही केली आहे. या मैदानाला विजापूर, दावणगेरी, हावेरी, गदक, धारवाड, हुबळी, बागलकोट येथून कुस्ती शौकिन येतात. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील विविध खेड्यांतून कुस्ती शौकिनांची उपस्थिती राहते. यावेळी दिग्गज मल्लांच्या कुस्ती मैदानात जास्तीतजास्त कुस्ती शौकिनानीं उपस्थित राहण्याचे आवाहन येळ्ळूर कुस्तीगीर संघटनेने केले आहे.









