वृत्तसंस्था/ मुंबई
भारतातील स्क्वॅशला एका ऐतिहासिक क्षणाचे वेध लागले असून इंडियन ओपन 2025 ही भारतातील पहिली पीएसए स्क्वॅश कॉपर स्पर्धा 24 पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत 53,500 अमेरिकन डॉलर्सची बक्षिसे ठेवलेली असून इंडियन ओपनचे अंतिम सामने 28 रोजी बॉम्बे जिमखाना येथे होणार आहेत.
ही स्पर्धा इनडोअर कोर्टवर होईल आणि उपांत्यपूर्व फेरी, सेमीफायनल आणि फायनल पूर्ण काचेच्या बाहेरील कोर्टवर खेळवली जाईल. यामुळे चाहत्यांना एक अनोखा अनुभव मिळेल, असे पीएसएने म्हटले आहे. सात वर्षांच्या अंतरानंतर देशात एक मोठी स्क्वॅश स्पर्धा खेळविली जाणार असून असून इंडिया ओपन ही भारतीय खेळाडूंसाठी आणखी महत्त्वाची आहे. कारण स्क्वॅश 2028 च्या लॉस एंजेलिस उन्हाळी खेळांमधून ऑलिंपिक पदार्पण करणार आहे.
इंडिया ओपनच्या आयोजनासह भारतात उच्चस्तरीय स्क्वॅशच्या पुनरागमनाची घोषणा इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सच्या अध्यक्षा मनीषा मल्होत्रा, सीओओ स्पोर्ट्स दिव्यांशू सिंग, रमित टंडन (भारतातील पुऊषांच्या स्क्वॅशमध्ये अव्वल क्रमांकाचा खेळाडू) आणि अनाहत सिंग (महिलांच्या स्क्वॅशमधील भारतातील तिसऱ्या क्रमांकाची खेळाडू) यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या स्पर्धेत रमित टंडन, वेलावन सेंथिलकुमार, वीर छोत्राणी, अनाहत सिंग आणि आकांक्षा साळुंखे यासारखे अव्वल भारतीय स्क्वॅश खेळाडू फ्रान्स, स्पेन, हॉलंड, इजिप्त, कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, मलेशिया आणि जपान या देशांमधील काही प्रतिभावान आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह मैदानावर उतरतील.
पुऊष आणि महिला या दोन्ही गटांत प्रत्येकी 24 खेळाडू सहभागी होतील. यामध्ये भारताचे रमित टंडन आणि आकांक्षा साळुंखे अव्वल मानांकित असतील. दरम्यान, इंडिया ओपनमध्ये भारताच्या सूरजकुमार चंद आणि अंजली सेमवाल यांना वाइल्ड कार्डवर प्रवेश मिळालेला आहे.









