3500 विद्यार्थ्यांचा सहभाग : विधान परिषद सदस्य गोविंदराज राजू यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी/ बेळगाव
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक डेच्या निमित्ताने आज जगभरातून दौड होत आहे. बेळगावात होत असलेल्या दौडमध्ये नागरिक, पोलीस खात्यातील कर्मचारी, विद्यार्थी, क्रीडापटूंनी मोठ्या संख्येने भाग घेतला असून ही आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन विधान परिषद सदस्य, कर्नाटक ऑलिंपिक संस्था व फिबा एशियाचे अध्यक्ष डॉ. के. गोविंदराज राजू यांनी केले.
जिल्हा प्रशासन, कर्नाटक राज्य ऑलिंपिक संस्था बेंगळूर व युवा सबलीकरण-क्रीडा खाते यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी येथील किल्ला आवारात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक डे रन 2025 दौडला झेंडा दाखवून डॉ. के. गोविंदराज राजू यांनी चालना दिली. याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक डे आचरणात आणताना प्रत्येकाने खेळाबद्दल आवड त्याचबरोबर नेतृत्त्वगुण अंगी बाणवावेत. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक डे रन 2025 ला किल्ला आवारातून सुरुवात झाली. क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा चौक, कृष्णदेवराय चौकमार्गे जिल्हा क्रीडांगणावर समारोप करण्यात आला. विविध शाळा, महाविद्यालये, वसतिगृहांतील सुमारे 3500 विद्यार्थी तसेच क्रीडापटू व नागरिकांनीही भाग घेतला होता.
ऑलिंपिक डे रन 2025 प्रसंगी आमदार राजू सेठ, राज्य ऑलिंपिक संस्थेचे महासचिव टी. अनंतराजू, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, युवा नेते सर्वोत्तम जारकीहोळी, युवा सबलीकरण-क्रीडा खात्याचे उपसंचालक बी. श्रीनिवास, अन्न-नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक मल्लिकार्जुन नायक यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.









