2025-26 वर्षासाठीचा अंदाज केला व्यक्त
नवी दिल्ली :
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने आर्थिक वर्ष 2025-26 आणि आर्थिक वर्ष 2026-27 करता भारताचा विकासदर 6.4 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज नव्याने वर्तवला आहे. याआधी एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय नाणे निधी संस्थेने भारताच्या विकासदराबाबत अंदाज वर्तवला होता. जागतिक व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा विकासदर कमी राहणार असल्याचे त्यावेळी संस्थेने म्हटले होते पण सध्याला भारताची आर्थिक परिस्थिती पाहता 2025 आणि 2026 मध्ये भारताचा विकास दर 6.4 टक्के इतका राहू शकतो असे नाणेनिधी संस्थेने म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा विकास हा 6.5 टक्के इतका राहिला होता, जो मागील पाच वर्षांमध्ये पाहता कमी मानला जात आहे.
इतरांचे अंदाज
याच दरम्यान रिझर्व्ह बँकेने मात्र चालू आर्थिक वर्षाकरिता आपला भारताचा विकासदर 6.5 टक्के इतका घोषित केलेला आहे. अर्थमंत्रालयानेसुद्धा आपला अंदाज व्यक्त केला असून 6.3 ते 6.8 टक्के विकासदर राहणार असल्याचे म्हटले आहे.









