सिद्धार्थ डोणे महाराज यांची भाकणूक : आप्पाचीवाडी-कुर्ली हालसिद्धनाथ यात्रेत भाविकांचा महापूर : पालखी मिरवणूक
निपाणी : चीन राष्ट्र भारतावर हल्ला करंल, चालंल गुंडांचं राज्य चालंल, अतिरेकी लोक येतील, मोठा घोटाळा करतील, बॉम्बस्फोट होतील, दिल्लीच्या गादीला धक्का बसंल, दिल्ली शहराची मोठी हानी होईल, बारा कोसाला एक दिवा दिसंल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडंल, दुनिया कालवून जाईल, भारत-पाक सीमेवर रण घुमंल, आया-बहिणींची अब्रू लुटतील, मुस्लीम राष्ट्र उद्ध्वस्त होईल, जगाच्या नकाशातून पुसून जातील. वादळं, भूकंपानं देशाच्या संपत्तीचं नुकसान होईल. कृष्णेच्या काठी नऊ लाख बांगड्या फुटतील, वाहतील रक्ताचे पाट वाहतील, अशी हालसिद्धनाथांची भाकणूक सिद्धार्थ डोणे महाराज यांनी कथन केली.
कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली येथील हालसिद्धनाथांच्या अश्विन यात्रेला 28 ऑक्टोबर रोजी उत्साहात सुऊवात झाली. नाथांची पहिली भाकणूक 31 रोजी पहाटे झाली. सिद्धार्थ डोणे महाराज यांनी नाथांच्या दरबारात येत्या काळातील होणाऱ्या बदलांचे भाकीत कथन केले. त्यात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, देश-विदेश, अतिरेकी, हवामान, नैसर्गिक आपत्ती याबद्दल भाकीत केले. त्या भाकणुकीचा हा गोषवारा…
मेघयान मळा माझ्या आकाशाच्या फळा, अमृताच्या धारा. हाय मेघ उदंड हाय, बांधा आड बांध, शिवा आड शिव. मेघाची कावड गैरहंगामी पण उदंड हाय. मेघाच्या पोटी आजार हाय, द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय, लागलाय त्यो दुनिया न्याहाळू लागलाय. त्याच्या मागं अंधार, म्होरं अंधार पडलाया. कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशातलं हाय, भोंबेच्या पुनवेला वाडी-कुर्लीच्या खडकाच्या माळाला झेंडा मिरवंल, भोंबेच्या पुनवेला माझा सोहळा निघतोया, चिंचेच्या बनात मी खेळायला जातोया. कारीच्या माळाला माझी विश्रांती हाय, खडकाच्या माळाला भाषण चाललंया, वाडी-कुर्लीच्या खडकाच्या माळाला फार पूर्वी काळाला आशान टाकलंय, निशाण रोवलंय.
महाराष्ट्र राज्यात नदीजोड प्रकल्प येईल
देशात समान नागरी कायदा येईल, महाराष्ट्र राज्यात नदीजोड प्रकल्प येईल, दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येईल, नंदनवन होईल. हाय धर्माची गादी हाय, धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा. पिंजऱ्यातील राघू भाषण करंल, चित्त देवाचं, पहिला मोगरा धोपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील, उ•ाण मारील. तिसरा मोगरा राज्य करील, तुम्ही बगाल अश्विनी, भरणी, कात्या, वॅढतिका, रोहिणी मृगाच्या बहिणी, सरती रोहिणी निघता मृग मिरवंल कुरी, मिरवंल कोकण बंधारी मिरवंल. बांधा आड बांध, शिवा आड शिव, रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा, साधंल तो सज्जन, हातात भाकरी, खांद्यावर चाबूक, साधंल तो सोबती. सरता मृग निघता आर्द्रा मध्यम फाट्याचा पेरा होईल. सरता आर्द्रा निघता तरणा, अलम दुनियेचा पेरा होईल, कुरी थाऱ्याला बसंल, रोहिणीची पेरणी त्याला हादक्याची पुरवणी क्हईल.
दीड महिन्याचं धान्य येईल
देवयान धान्य उदंड पिकंल, राजयान धान्य उदंड पिकंल. धारणं धुरणं जगाचं जगवनं. खळ्याच्या काठी 3 मापटी म्हणतील, 3 मापटी म्हणता शेरावर येईल. चढंल उतरंल, शेर म्हणता मापट्या चिपट्यावर येईल. खरीप भोरीप बहुत उदंड पिकंल, जमिनीतलं धान्य बहुत बेमानं राहील, तांबडी रास मध्यम पिकंल, मोलानं विकंल, काळी रास सुफळ जाईल, मूग कडधान्य तूर उदंड पिकंल. सर्वसामान्य माणूस खात राहील. दीड महिन्याचं धान्य येईल. पांढरी रास उदंड पिकंल, गोरगरिबाला पुरावा करील, तांबडी कळी मध्यम पिकंल. ती ताजव्यातून जोकंल, कागदातून विकंल, धान्य दारात, वैरण कोन्यात, वैरण सोन्याची होईल, सांभाळून ऱ्हावा, ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल, धान्या दुनियाची वैरण काडीची चोरी-मारी वाढत राहील. कानानं ऐकाल, डोळ्यानं बघत राहशीला, सांभाळून ऱ्हावा. गक्हाची पेंडी मध्यम पिकंल. पिकंल ती बांध आड बांध शिवा आड शिव पिकंल.
दूध घालणारा कर्जातच राहिल
शेतकरीवर्ग दिवस-रात्र कष्ट करंल, कष्ट करून गुऱ्हंढोरं घेईल, घेऊन निगा करून धारदुबतं डेरीला घालंल, डेरीचा मॅनेजर मलई खाईल, दूध घालणारा कर्जातच राहिल, गाई-म्हशींचा भाव गगनाला भिडंल. खडकाच्या माळाला 33 कोटी देवांचा दरबार भरलाया. कांबळ्याच्या खोळंत मी फुले माळत बसलोया. बसलोया बसलोया मी पृथ्वीची घडामोड करत बसलोया, आप्पाचीवाडी तीर्थक्षेत्र प्रति शिर्डी क्हईल. तिऊपती बालाजीचा इथं अवतार हाय. आप्पाचीवाडी सोन्याची काडी, वाडी-कुर्ली आगार इथं नाथांचा भरलाय दरबार. हालसिद्धनाथांची पुण्यभूमी पवित्र राहील, महिमा जगात वाढत राहील. वाडी-कुर्लीच्या पुजारी, मानकऱ्यास्नी माझा आशीर्वाद हाय, वाडी-कुर्लीच्या सबिन्यात फूट पाडशीला तर यमपुरी बघशीला.
भगवा झेंडा राज्य करील
शिवाजी महाराजांचा जयजयकार करा, शिवाजी महाराज जन्माला येतील, भगवा झेंडा राज्य करील. सभेतून मिरवेल, एक तारणार कळप मारणार, कळप तारणार कळपातला एक हुडकून मारणार. ज्याच्या अंगी भक्ती तो चार दिवस सुखाचं खाणार, हालसिद्धनाथांची करशीला चाकरी, तर खाशीला भाकरी, थराचा धोंडा थराला बसंल, नऊ पृथ्वी दहा खंड काशीबरोबर हाय, दहाक्या काशीत माझं दप्तर हाय, करवीर काशीत माझा ठिकाणा हाय, आहे ही गोसाक्याची पांढरी आहे, गोसाक्याच्या पांढरीत तुम्ही एकीनं वागावं, वागू नये गर्वाने वागू नये. गर्वाने वागशीला तर फसून जाशीला, गर्वाचे घर खाली हाय. मी थोरला, तू थोरला म्हणू नकोसा, लहानाचा मोठा, मोठ्याचा लहान होईल, हाय की हाय हा विषाचा पेला हाय ह्यो खैराचा इंगोळ हाय, वाडी-कुर्लीच्या बाळांनो एकीने वागा.
शेती व्यवसायावर संकट येईल
उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळ्याचा उन्हाळा होईल, बारमाही पाऊस होईल, धर्माचा पाऊस, कर्माचं पीक होईल. काळ्या खडकाच्या लाह्या उडतील, खडकाच्या माळाला तुम्ही धडका खाशीला, कोल्हापूरच्या देवीला मोठं संकट पडलंया, रात्री बाराच्या वेळेला तिच्या नेत्रातून पाणी पडतंया, परमेश्वर त्याचा न्यायनिवाडा करतील, साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील, शेती व्यवसायावर संकट येईल, हाय ही भाकरीवरची भाजी हाय, सांभाळून खावा. कामगारांना भाव येईल, मोठे लोक दारात बसतील. संप हारताळाची पाळी देशावर येईल. जंगलातील प्राणी, पक्षी गावात येतील, धुमाकूळ घालतील, गावातला माणूस भयभीत होईल, अशी सिद्धार्थ डोणे महाराज यांनी भाकणूक कथन केली.
भारतमातेचा जगभरात जयजयकार होईल
अठरा तऱ्हंचं माणसाला आजार होतील, आडं चुकंल पण खेडं चुकणार नाही, डॉक्टर लोक हात टेकतील, बारा कोसाला एक दिवा लागंल, माणसाची वसती विरळ होईल. वादळं, भूकंपानं समुद्राची उलथापालथ होईल. अलम दुनियेचा चवथाई कोना वसाड पडंल. कोरोना किती बी वाढला तरी त्याला पायाखाली घेईन, पण लक्षात घ्या, जपून ऱ्हावा. मराठा सैनिक मृत्यूला भिणार नाही, छातीची ढाल करील, भारत-पाकिस्तान लढत राहील, पाकिस्तानचा चौथाई कोना भारतात समाविष्ट होईल, भारतमातेचा जगभरात जयजयकार होईल, पाकिस्तान राष्ट्र उद्ध्वस्त होईल. जगाच्या नकाशातून पुसून जाईल. जगातील तापमानाचा धोका वाढत जाईल, जंगलात आग लागंल, वणवा पेटंल, वन्यजीवन अडचणीत येईल, औषधी वनस्पती पृथ्वीवरून नष्ट होतील, भारत देशात समान नागरी कायद्याचा हक्क येईल, महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प येईल, दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येईल, नंदनवन होईल. जाती-धर्माचं राजकारण बिघडून जाईल, जाती-धर्मात वैरत्व वाढंल, वाढलेल्या वैरत्वातून हाणामाऱ्या होतील.









