वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंचकुला येथे 24 मे रोजी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेमध्ये जगातील अव्वल भालाफेकधारक सहभागी होणार असून भारताचा दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विश्व अॅथलेटिक्स फेडरेशनच्या कार्यकारी संघटनेमध्ये नीरज चोप्राचा समावेश आहे. पंचकुलातील ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये ही स्पर्धा घेतली जाणार असून या स्पर्धेला अ दर्जा देण्यात आला आहे. विश्व अॅथलेटिक्स फेडरेशनच्या वेबसाईटवर यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अॅथलेटिक्स स्पर्धांच्या वेळापत्रक कार्यक्रमामध्ये पंचकुलातील स्पर्धेचा समावेश करण्यात आलेला नाही. जानेवारीच्या सुरुवातीला अव्वल दर्जाची अॅथलेटिक्स स्पर्धा यशस्वीपणे भरविण्याची क्षमता भारतामध्ये निश्चितच असल्याचे विश्व अॅथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष सेबेस्टियन को यांनी म्हटले आहे. पंचकुलातील ही स्पर्धा अखिल भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशन आणि जेएसडब्ल्यु स्पोर्ट्स यांच्या संयुक्त यजमानपदाने भरविण्याली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची भालाफेक स्पर्धा प्रत्येकवर्षी भरविण्यावर तसेच विश्व अॅथलेटिक्स स्पर्धा कार्यक्रमामध्ये याचा सहभाग करण्याकरिता नीरज चोप्रा आणि जेएसडब्ल्यु स्पोर्ट्स यांचे प्रयत्न सुरू आहेत.
पंचकुलातील होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे भारताच्या अॅथलेटिक्सचा दर्जा निश्चितच वाढेल, असे अखिल भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष बहादुरसिंग सागो यांनी म्हटले आहे. यापूर्वी पंचकुलामध्ये आयोजित केलेल्या कनिष्ठांच्या सराव शिबिरामध्ये नीरज चोप्राने आपला बहुमोलवेळ खर्च केला आहे. आता याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची भालाफेक स्पर्धा घेतली जात आहे. 27 वर्षीय निरज चोप्रा हा हरियाणातील पानीपत जवळ असलेल्या खंड्रा ग्रामीण भागातील रहिवासी आहे. 2012 ते 15 या कालावधीत नीरज चोप्राने पंचकुलाच्या ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये सराव केला आहे. त्यानंतर हे राष्ट्रीय शिबिर पतियाळाच्या राष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये 2015 अखेरीस हलविण्यात आले आहे. सध्या नीरज चोप्राला जेन झिलेझेनी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. 2025 च्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेला 16 मे पासून प्रारंभ होत आहे. नीरज चोप्रा या स्पर्धेत सहभागी होत आहे.









