पाच जणांना अटक : ‘डंकी रुट’ने लोकांना अमेरिकेत पाठवून कोट्यावधी रुपये कमावले
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमध्ये मानवी तस्करीचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क उघडकीस आले आहे. या मानवी तस्करांनी ‘डंकी रुट’ने लोकांना अमेरिकेत पाठवण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपये कमावले आहेत. हजारीबाग पोलिसांनी या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून या व्यवहारांमध्ये माफियांनी कोट्यावधी रुपये कमावल्याची बाब उघड झाली आहे. झारखंड पोलिसांनी या मानव तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे.
हजारीबाग पोलीस या प्रकरणाकडे एक मोठे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेट म्हणून पाहत आहेत. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर व्यक्ती आणि माफिया नेटवर्कचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सर्वसामान्यांना अशा कोणत्याही सापळ्यात अडकू नये. अशा कोणत्याही संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांना कळवा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हजारीबाग जिह्यातील तातीझारिया पोलीस स्टेशन परिसरातील भाराजो गावातील रहिवासी सोनू कुमार यांनी 30 जुलै 2025 रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली. मूळचा या गावातील रहिवासी आणि सध्या अमेरिकेत व्यवसाय करणाऱ्या उदय कुमार कुशवाहा यांनी त्यांना 2024 मध्ये बनावट कागदपत्रांसह अमेरिकेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून मानवी तस्करीच्या ‘डंकी रुट’ने ब्राझीलला पाठवले. त्यानंतर रस्त्याने, नदीमार्गे अनेक देशांमधून अमेरिकेत पोहोचल्याची माहिती तपास यंत्रणांना दिली होती. त्यानंतर उदय कुमारने विकास कुमार आणि जरगा येथील रहिवासी पिंटू कुमार यांना वेगवेगळ्या दिवशी दिल्लीहून ब्राझीलला पाठवले. ब्राझीलमध्ये पोहोचल्यानंतर, या तिघांना आंतरराष्ट्रीय ‘डंकी रुट’ माफियांच्या स्वाधीन करण्यात आले. या माफियांनी दोघांनाही लपवून बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, पनामा, कोस्टा रिका, होंडुरास आणि ग्वाटेमाला मार्गे रस्ते आणि नदीमार्गे अमेरिकेत नेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा सोनू कुमार यांनी आपल्या तक्रारीत केला होता. या प्रकरणाचा रितसर तपास करत झारखंड पोलिसांनी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटची पाळेमुळे खोदण्यास सुरुवात केली आहेत.









