ए. सेंगोत्तेwयन यांच्या समर्थकांचीही हकालपट्टी
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे, तरीही मुख्य विरोधी पक्ष अण्णाद्रमुकमधील अंतर्गत कलह वाढतच चालला आहे. अण्णाद्रमुक नेतृत्वाने शुक्रवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेला नेता ए. सैंगोत्तेयन यांच्या समर्थकांनाही बाहेरचा मार्ग दाखविला आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्या पक्ष सदस्यांमध्ये माजी खासदार व्ही. सत्यभामा यांचाही समावेश आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे सैंगोत्तेयन यांच्या समर्थकांवर ही कारवाई करण्यात आल्याचे पक्षनेतृत्वाकडून एका वक्तव्याद्वारे सांगण्यात आले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अण्णाद्रमुकच्या विविध गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सेंगोत्तेयन करत होते. सैंगोत्तैयन यांना 14 नेते याप्रकरणी साथ देत होते. याच 14 नेत्यांची हकालपट्टी करण्याचा आदेश अण्णाद्रमुक महासचिव एडप्पादी पलानिस्वामी यांनी दिला आहे. माजी मंत्री सेंगोत्तेयन यांच्या विरोधात सुरू करण्यात आलेलया कारवाईनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सेंगोत्तैयन यांनी अलिकडेच पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले नेते ओ. पनीरसेल्वम, व्ही.के. शशिकला आणि त्यांचे पुतणे टीटीव्ही दिनाकरन यांची भेट घेतली होती. सेंगोत्तैयन यांना पक्षातून हाकलण्यात आल्यावर दिनाकरन यांनी पक्ष महासचिव पलानिस्वामी यांच्यावर निशाणा साधला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत जनताच पलानिस्वामी यांना धडा शिकवेल असे दिनाकरन यांनी म्हटले होते.









