बेळगाव : एच. डी. कुमारस्वामी लेआऊटला बससेवा सुरू करण्यात आली आहे. आजवर लेआऊटच्या आतमध्ये बसेस जात नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली होती. शनिवारी सकाळी पहिली बस लेआऊटमध्ये दाखल झाली.
एच. डी. कुमारस्वामी लेआऊटमधील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. या परिसरात तीन विद्यार्थी-विद्यार्थिनी वसतिगृहे आहेत. 300 विद्यार्थी या वसतिगृहात आहेत. या विद्यार्थ्यांना आतमध्ये बस येत नाही म्हणून शाळा-कॉलेजला जाणे कठीण झाले होते.
संघटनेच्यावतीने परिवहन मंडळाचे राजेश हुद्दार यांना निवेदन देण्यात आले होते. देवाक्का नायक यांनी येथील समस्या लक्षात घेऊन यापुढे लेआऊटच्या आतमध्ये बस पाठविण्याची सूचना केली आहे. शनिवारी सकाळी 8.30 वाजता पहिली बस आली. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष व्ही. जी. निरलगीमठ, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन रोट्टी, सी. बी. संगोळ्ळी, एस. सी. गंगापूर, कृष्णा हंदीगुंद, जोळद, कुलकर्णी, पेंपण्णा कोण्णूर, दोडमनी, अनिता व जयश्री तळवार आदी उपस्थित होते. हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनीही बसचे स्वागत केले. त्यानंतर पूजन करण्यात आले.









