मोहम्मद युनूस प्रमुख : राष्ट्रपतींनी दिली पदाची शपथ : 15 सदस्यांचा समावेश शक्य
वृत्तसंस्था /ढाका
बांगलादेशमध्ये शेख हसीना यांची सत्ता उलथवून नवे अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. मोहम्मद युनूस आणि नवीन अंतरिम सरकारच्या सदस्यांना बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बांगलादेशात शेख हसीना यांनी बांगलादेशवर 15 वर्षे एकतर्फी राज्य केल्यानंतर आता अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. देशातील मोठ्या बंडखोरीमुळे अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांना सोमवारी राजीनामा देऊन देश सोडावा लागला होता.
मोहम्मद युनूस हे बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख बनले आहेत. गुरुवारी रात्री 8.50 वाजता राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. बांगलादेशचे अंतरिम सरकार 15 सदस्यांचे असणार आहे. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा अंतरिम सरकारमध्ये सामील असलेल्या लोकांवर खिळल्या आहेत. शपथविधी सोहळ्याला सुमारे 400 लोक उपस्थित होते. भारतालाही अंतरिम सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले होते.
अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार बनल्यानंतर मोहम्मद युनूस जमुना येथील स्टेट गेस्ट हाउसमध्ये राहणार आहेत. हसीना देश सोडून गेल्यानंतर निदर्शकांनी पंतप्रधान निवास गणभवनमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी येथे तोडफोड केल्यामुळे गणभवन सध्या राहण्यास योग्य नाही. त्यामुळे सद्यस्थितीत राज्य अतिथीगृह हे मुख्य सल्लागारांचे निवासस्थान करण्यात आले आहे.
1,500 बांगलादेशींना बीएसएफने रोखले
दुसरीकडे, बांगलादेशातील हिंसाचार आणि राजकीय गोंधळादरम्यान बीएसएफने भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे 1,500 बांगलादेशींना रोखले आहे. त्यापैकी 1 हजार लोक बिहारमार्गे भारतात येत होते तर 500 लोक पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमार्गे भारतात येत होते. घुसखोरी पाहता भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफला सतर्क करण्यात आले आहे.
युनूस यांच्यासाठी विद्यार्थी आग्रही
डॉ. मोहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे प्रमुख बनवण्याची मागणी बांगलादेशच्या विद्यार्थी संघटनांनी केली होती. याप्रश्नी त्यांनी लष्करासह सर्वच राजकीय पक्षांना अल्टिमेटम दिला होता. इतर कोणालाही प्रमुख बनवणे आम्हाला अमान्य असल्याचा इशारा अनेक संघटनांनी दिला होता. अशा परिस्थितीत परदेशात असलेल्या डॉ. युनूस यांनी गुऊवारी दुपारी बांगलादेश गाठून ढाका विमानतळावर लष्करप्रमुख, नागरी समाजाचे सदस्य आणि विद्यार्थी नेत्यांची भेट घेतली. या बैठकीत डॉ. युनूस यांच्यासोबत अंतरिम सरकारमध्ये सहभागी होणाऱ्या इतर सल्लागारांची नावे निश्चित करण्यात आली. त्यानुसार विविध मान्यवरांना अंतरिम सरकारमध्ये स्थान देण्यात आले आहे.
कामगार कायद्याचे उल्लंघन : युनूस यांची निर्दोष मुक्तता
ढाका न्यायाधिकरणाने बुधवारी मोहम्मद युनूस यांची कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली. ग्रामीण टेलिकॉमच्या आणखी तीन उच्चपदस्थांनाही दोषमुक्त करण्यात आले. जानेवारी 2015 मध्ये युनूस यांना 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. प्राध्यापक युनूस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 28 जानेवारी रोजी याविरोधात अपील दाखल केले होते.









