पुणे / वार्ताहर :
पुण्यात घरफोडया करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला. टोळीप्रमुखाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून विविध गुन्ह्यातील 3 लाखांची रोकड, दोन मोटार, लोखंडी कटावणी असा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुरेंद्र असलारामजी चौधरी (28, रा. मु. पो सौजाद ता. मारवाडी, जिल्हा झालोर राजस्थान) असे अटक केलेल्या टोळीप्रमुखाचे नाव आहे. त्याचे साथीदार नेमाराम उर्फ डौलाराम चौधरी, भुंडाराम उर्फ राजु चौधरी पसार आहेत. आरोपीने साथीदारांच्या मदतीने उंड्री, कोंढवा, भोसरी, लोणीकंद, यवत, मंचर परिसरात चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.
घरफोडया करणारी टोळी सासवड भागातील चांभळी गावात राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांना मिळाली. टोळीचा प्रमुख सुरेंद्र असलारामजी चौधरी हा साथीदारासह मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी चोरी करण्यासाठी बाहेर पडतो. त्यांनी कोंढवा भागातही मोटार चोरी करुन घरफोडी केली आहे. तो कान्हा चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने सापळा रचून सुरेंद्रला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने नेमाराम उर्फ डौलाराम चौधरी, भुंडाराम उर्फ राजु चौधरी यांच्यामदतीने चोऱया केल्याची कबुली दिली.








