बेळगाव : एसकेई सोसायटी संचालित जीएसएस पदवीपूर्व महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल चंद्रनील रामनाथकर तर अध्यक्षस्थानी एसकेईचे व्हाईस चेअरमन एस. वाय. प्रभू उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य एस. एन. देसाई, प्रा. अनिल खांडेकर, विद्यार्थी निरंजन चिंचणीकर, विद्यार्थी प्रतिनिधी तनिष्का विल्सन उपस्थित होते.
प्रारंभी पावनी ऐरसंग हिने स्वागत केले. प्रा. डॉ. कीर्ती फडके यांनी परिचय करून दिला. मान्यवरांचे मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या दोन दिवसीय महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी ट्रेझर हंट, व्हिडिओग्राफी, नृत्य, गायन, विज्ञानातील नमुने, पथनाट्या, विज्ञान प्रश्नमंजुषा, यंत्रमानव स्पर्धा, फॅशन शो, चित्रकला स्पर्धा, कला, एकपात्री अभिनय, व्यंगचित्र, मेंटर चॅलेंज आदी स्पर्धा झाल्या. या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी कर्नल चंद्रनील रामनाथकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्याबरोबर एस. वाय. प्रभू यांनीही विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले. रेजोनन्स या स्पर्धेत डिव्हाईन प्रॉव्हिडन्स या शाळेने जनरल चॅम्पियनशीप तर ब्लुमिंग बड्स या शाळेने उपविजेतेपद पटकाविले आहे. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचलन जोया इनामदार हिने केले.









