प्रवाशांची गैरसोय, रिक्षांचा आधार, महिलांना आर्थिक फटका
बेळगाव : मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या शक्ती योजनेमुळे महिलांचा मोफत प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी बसफेऱ्या अनियमित होऊ लागल्या आहेत. विशेषत: शहरांतर्गत बससेवा विस्कळीत झाली आहे. विविध ठिकाणी बसफेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. शहरातील सुभाषनगर, वीरभद्रनगर, ओमकारनगर, कुवेंपूनगर आदी ठिकाणी बससेवा उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवाशांना रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे महिलांना आर्थिक फटका बसू लागला आहे. जसजसा शहराचा विस्तार वाढला तसतशी लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे बस वाहतुकीवरदेखील ताण वाढत आहे. सुभाषनगर परिसरात मनपा, कन्नड व सांस्कृतिक विभाग, मागासवर्गीय कल्याण विभाग, अल्पसंख्याक कल्याण विभाग, वसतिगृहे, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आहेत. मात्र बससेवा नसल्याने या साऱ्यांना रिक्षाद्वारेच ये-जा करावी लागत आहे. विशेषत: शाळकरी विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. शहरांतर्गत बसफेऱ्या अपुऱ्या पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. सुभाषनगर, ओमकारनगर परिसरात लोकवस्ती अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्यादेखील मोठी आहे. मात्र बसची सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. मध्यवर्ती बसस्थानकातून ये-जा करण्यासाठी बस नसल्याने खासगी वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना चालत घर ते शाळा प्रवास करावा लागत आहे. कुवेंपूनगर, ओमकारनगरमधील शैक्षणिक संस्था आणि लहान सहान उद्योगधंदे आहेत. मात्र बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आह
प्रवाशांनी प्रथमत: परिवहन बसला प्राधान्य द्यावे…
सुभाषनगर, ओमकारनगर परिसरातील प्रवासी खासगी वाहनांने ये-जा करतात. या परिसरात परिवहनच्या बसला प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे बस रिकामी धावते. महसूलदेखील मिळत नाही. यासाठी प्रवाशांनी प्रथमत: परिवहन बसला प्राधान्य देणे गरजेचे आहे.
-के. के. लमाणी (डीटीओ बेळगाव)









