मूठभर कन्नडप्रेमींच्या प्रेमाखातर कन्नड प्राधिकरण अध्यक्षांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
सीमाभागामधील मराठी भाषिकांवर कन्नडची दडपशाही सुरू आहे. असे असताना पुन्हा कन्नड प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. टी. एस. नागाभरण यांनी कन्नडसक्ती अधिक तीव्र करावी, अशी सूचना अधिकाऱयांना केली आहे. काही कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱयांनी खोटेनाटे सांगून त्यांना भडकविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी अधिकाऱयांना या ठिकाणी कन्नड अधिक प्रमाणात तीव्र करण्याकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन त्यांनी अधिकाऱयांना सूचना केल्या. यावेळी जास्तीत जास्त सर्व व्यवहार कन्नडमध्ये करावेत, असे सांगितले. कर्नाटकात राहत असल्यामुळे कन्नड प्रत्येकाला आलेच पाहिजे. त्यासाठी कन्नडची सक्ती अधिक केली पाहिजे. यावेळी काही मूठभर जमलेल्या कन्नडप्रेमींनी त्यांना मराठी भाषिकांच्या विरोधात भडकविण्याचा प्रयत्न केला.
म. ए. समितीच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर पोलीस योग्यप्रकारे गुन्हे दाखल करत नाहीत. काही ठिकाणी असलेले भगवे ध्वज काढावेत, तसेच कन्नड ध्वज लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करणे गरजेचे आहे. मात्र येथील अधिकारी सहकार्य करत नाहीत, अशी माहिती दिली. एकूणच त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या कन्नडप्रेमींनी केला. यामुळे काहीजण दबक्मया आवाजातच त्यांच्याच विरोधात बोलत होते.
उचगाव कमानीबाबत केली तक्रार
उचगाव गावच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या कमानीवर कन्नडसह मराठी भाषेमध्ये लिहिले आहे. मात्र त्या ठिकाणी केवळ कन्नडमध्येच लिहिले, अशी खोटी माहिती दिली. याबाबत जिल्हा पंचायतच्या एका अधिकाऱयाला कन्नड प्राधिकरणाच्या नागाभरण यांनी त्या कमानीवर कन्नडमध्ये लिहिण्याचा आदेश दिला. त्यावेळी संबंधित अधिकाऱयाने येत्या दोन दिवसांत कमानीवरील मराठी कमी करून कन्नड लिहू, असे सांगितले. मात्र इतर अधिकाऱयांनी तो प्रश्न फार गंभीर आहे. तेव्हा कोणीही अधिकाऱयांनी विचार करून उत्तर द्यावे, अशी सूचना केली. यामुळे कन्नडप्रेमींची तोंडेच पडली होती.
या बैठकीला अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, स्मार्ट सिटीचे शशिधर कुरेर, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
आम्हाला दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार नाही…
मराठी भाषिकांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी मूठभर कन्नडप्रेमींनी केली. मात्र कन्नड प्राधिकरणचे नागाभरण यांनी आम्हाला केवळ सूचना करता येतात. कोणतीही कारवाई करता येत नाही. त्याबाबत आमच्याकडे कोणतेच अधिकार नाहीत, असे सांगितले. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून विधानसभेमध्ये विधेयक मांडण्यास भाग पाडू, असे सांगितले. त्यांच्या या उत्तरामुळे सर्व कन्नडदुराभिमान्यांची नाचकी झाली.