ओडीशातील संभलपूर मतदारसंघात यावेळी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते धर्मेंद्र प्रधान आणि बिजू जनता दलाचे प्रणव प्रकाश दास यांच्यात संघर्ष होत आहे. धर्मेंद्र प्रधान केंद्रात मंत्री झाल्यापासून प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या रणमैदानात आहेत. तर दास हेही ज्येष्ठ नेते आहेत.
या मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत प्रथमच भारतीय जनता पक्षाचा विजय झाला होता. या पक्षाचे नितेश गंगा देब हे 9 हजार 162 मतांच्या निसटत्या अंतराने विजयी झाले होते. मात्र, यावेळी त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली असून केंद्रीय मंत्री प्रधान यांना आणले आहे. प्रधान हे भारतीय जनता पक्षाचे ओडीशातीलच नेते असून ते 2014 पासून केंद्रीय मंत्री आहेत.
शेतकरी, विणकर निर्णायक
हा बव्हंशी ग्रामीण मतदारसंघ असून येथे शेतकरी आणि विणकर यांची मते मोठ्या संख्येने आहेत. हीच मते निर्णायक ठरतात असा अनुभव आहे. या मतदारसंघात विधानसभेचे सात मतदारसंघ असून त्यांच्यापैकी पाच बिजू जनता दलाकडे आहेत. तर दोन भारतीय जनता पक्षाकडे आहेत. शेतकरी आणि विणकर यांच्यासह या मतदारसंघात अन्य मागासवर्गीय आणि दलितांची मतेही लक्षणीय प्रमाणात आहेत. धर्मेंद्र प्रधान हे येथून 15 वर्षांच्या नंतर लोकसभा निवडणूक लढवित आहेत. सध्या ते बिहार विधानसभेतून राज्यसभा सदस्य आहेत.
युतीच्या काळात बिजद
1998, 1999 आणि 2004 या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाची बिजू जनता दलाशी युती होती. या तीन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ बिजू जनता दलाकडे होता आणि त्या पक्षाने तीन्ही निवडणुकांमध्ये विजयही मिळविला होता. तथापि, नंतर युती तुटल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्ररित्या संघर्ष करीत आहेत. एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता.
बिजद उमेदवार आमदार
बिजदचे उमेदवार दास हे याच मतदारसंघातील एका विधानसभा क्षेत्राचे तीनवेळा आमदार आहेत. ते ज्येष्ठ नेते असल्याने ही निवडणूक चुरशीची होईल, असा कयास आहे. काँग्रेसने येथे बिजू जनता दलाचे माजी खासदार नागेंद्र प्रधान यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथे त्रिकोणी लढत पहावयास मिळत आहे.
‘रंग बदलू’ मतदारसंघ
हा नेहमी रंग पालटणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत येथे काँग्रेसचा उमेदवार 19 हजार मतांच्या अंतराने विजयी झाला होता. 2014 मध्ये बिजू जनता दलाचा उमेदवार 30 हजार मतांच्या आधिक्क्याने यशस्वी झाला होता. तर 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला 9 हजारांच्या अंतराने यश मिळाले होते. त्यामुळे यंदा काय होणार याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे. धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना केंद्र सरकारने गरीबांसाठी लागू केलेल्या योजनांचा लाभ होईल, अशी भारतीय जनता पक्षाची अपेक्षा आहे.
मात्र, त्यांचे प्रतिस्पर्धी याच भागातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले असल्याने त्यांचा जनसंपर्क चांगला असल्याचे बोलले जाते. दोन्ही प्रतिस्पर्धी आपल्याच विजयाचा विश्वास व्यक्ती करीत आहेत.









