काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या प्रस्तावात मागणी : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरण
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पाकिस्तानकडून रचण्यात आलेल्या कटाच्या माध्यमातून झालेला पहलगाम दहशतवादी हल्ल भारतीय प्रजासत्ताकच्या मूल्यांवर थेट हल्ला असल्याचे काँग्रेसने गुरुवारी म्हटले आहे. केंद्रशासित प्रदेशात अशाप्रकारचा हल्ला ज्यामुळे झाला, ते गुप्तचर अपयश आणि सुरक्षा त्रुटींचे व्यापक विश्लेषण केले जावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस कार्यकारिणी समितीने पहलगाम येथील हल्ल्याला भ्याड ठरवत याचा कट रचण्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरविले आहे. हल्लेखोर भारताला अस्थिर करण्याच्या उद्देशाने एका मोठ्या सीमापार कटाचे हिस्सा होते, असा आरोप काँग्रेसने केला.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदत समितीकडून संमत प्रस्ताव वाचून दाखविला. कार्यकारिणी समिती 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त करते, या हल्ल्यात 26 निर्दोष पर्यटकांना जीव गमवावा लागला व 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. कार्यकारिणी समिती शोकाकुल परिवारांबद्दल स्वत:च्या संवेदना व्यक्त करते. तसेच या दु:खाच्या क्षणाला या परिवारासोबत आम्ही उभे आहोत, असे प्रस्तावात म्हटले गेले आहे.
जाणूनबुजून हिंदूंना केले लक्ष्य
पूर्ण देशातील भावना भडकविण्यासाठी जाणूनबुजून हिंदूंना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले आहे. आम्ही या गंभीर चिथावणीसमोर शांततेचे आवाहन करतो व प्रतिकूल परिस्थितींमध्ये स्वत:च्या सामूहिक शक्तीचा पुनरुच्चार करतो. राष्ट्रीय कार्यकारिणी समिती शांततेचे आवाहन करत दृढसंकल्प व एकतेसह सीमापार दहशतवादाशी लढण्याच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दीर्घकालीन संकल्पाची पुष्टी करते. राष्ट्राच्या सामूहिक इच्छाशक्तीला प्रदर्शित करण्यासाठी काँग्रेसने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याचा आग्रह केला होता असे प्रस्तावात म्हटले गेले. पहलगामला अत्यंत सुरक्षाप्राप्त क्षेत्र म्हणून ओळखले जाते, तेथे त्रिस्तरीय सुरक्षाव्यवस्था आहे. गुप्तचर अपयश आणि सुरक्षा त्रुटींचे व्यापक विश्लेषण करणे आवश्यक आहे. गुप्तचर अपयश आणि सुरक्षा त्रुटींमुळे हा हल्ला केंद्रशासित प्रदेशात झाला असून हे क्षेत्र थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधीन येत असल्याचे कार्यकारिणी समितीने म्हटले आहे.
मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली
काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि कार्यकारिणी समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. राहुल गांधी हे अमेरिकेत्चा स्वत:चा दौरा मध्येच रोखून मायदेशी परतले आणि या बैठकीत सामील झाले.
सुरक्षेला राष्ट्रीय प्राथमिकता
संबंधित प्रश्न व्यापक जनहिताकरता उपस्थित करण्याची गरज आहे. याच माध्यमातूनच पीडित परिवारांना न्याय मिळू शकतो. पक्षाच्या कार्यकारिणीने अमरनाथ यात्रेत लाखो भाविक सामील होत असल्याचे म्हणत त्यांच्या सुरक्षेला राष्ट्रीय प्राथमिकता मानण्यात यावे अशी मागणी प्रस्तावात केली आहे. कुठल्याही विलंबाशिवाय मजबूत, पारदर्शक आणि सक्रीय सुरक्षा व्यवस्था लागू केली जावी. भाविकांची सुरक्षा तसच जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या उपजीविकेचे प्रामाणिकपणे रक्षण केले जावे, अनेक लोक पर्यटनावर निर्भर असल्याचे काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीने म्हटले आहे.









