ई-श्रम पोर्टलवर नावे दाखल करण्याचे आवाहन : तरुण भारत कार्यालयात कार्यक्रम
बेळगाव : देशामध्ये संघटित कामगारांपेक्षा असंघटित कामगारांची संख्या अधिक आहे. त्याचा केंद्र सरकारने सर्व्हे केला असून, आता असंघटित कामगारांसाठी विविध योजना लागू करण्यासाठी पाऊल उचलले आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी 1 ते 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा लागू करण्यात आला आहे. त्यासाठी वृत्तपत्र विव्रेत्यांनी कामगार कार्यालयाच्या ई-श्रम पोर्टलवर आपली नावे नोंद करावीत, असे आवाहन साहाय्यक कामगार आयुक्त ए. बी. अन्सारी यांनी केले. तरुण भारत कार्यालयात वृत्तपत्र विक्रेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्याचबरोबर ई-श्रम पोर्टलवर त्यांची नावे दाखल करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये त्यांनी वृत्तपत्र विव्रेत्यांना याबाबत माहिती दिली आहे. पहाटेच्यावेळी वृत्तपत्र विकणे व घरोघरी जाऊन पोहोचविण्याचे काम आपण करता. एखाद्यावेळी चुकून अपघात घडल्यास हा विमा मिळू शकतो. तेव्हा आपले आधारकार्ड, बँक पासबुकची माहिती ई-श्रम पोर्टलवर देणे गरजेचे आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. तेव्हा वृत्तपत्र विक्रेत्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
कामगार अधिकारी मल्लिकार्जुन जोगूर म्हणाले, कोविडकाळात असंघटित कामगारांची संख्या पाहून सरकारने त्यांच्यासाठी योजना राबविण्याचे ठरविले आहे. प्रथम यामध्ये वृत्तपत्र वितरकांना प्राधान्य दिले असून याचा लाभ घ्यावा, असे सांगितले. यापुढे सरकार अनेक योजना राबविणार आहे. तेव्हा नोंद झाली तर त्या योजनांचा लाभही घेता येणार आहे. तेव्हा ई-श्रम पोर्टलवर नोंद करून घ्या, असे सांगितले. यावेळी कामगार अधिकारी तरुनम् बंगाली यांनी 16 ते 59 वर्षांपर्यंतच्या वृत्तपत्र विव्रेत्यांना याचा लाभ मिळणार आहे. 16 वर्ष म्हणजे बालकामगार ठरू शकतो. मात्र देशामध्ये अनेक विद्यार्थी पहाटे वृत्तपत्राचे वितरण करून शिक्षण घेत आहेत. त्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे. तेव्हा सर्व विक्रेत्या मुलांनी देखील लाभ घेण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री, तरुण भारतचे वितरण व्यवस्थापक अनिल शेलार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वितरण प्रतिनिधी गजानन वरणे यांनी केले. दरम्यान वृत्तपत्र विक्रेत्यांना कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी वृत्तपत्र वितरण संघाचे जिल्हाध्यक्ष नामदेव कल्लीग•ाr, अध्यक्ष दीपक राजगोळकर, उपाध्यक्ष श्रीकांत नेवगी, सेक्रेटरी राजू भोसले, खजिनदार सुभाष गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.









