लहान भावाकडून मोठ्या भावाचा खून : कल्लोळी येथील नात्याला काळिमा फासणारा गुन्हा
बेळगाव : विम्याची रक्कम लाटण्यासाठी मोठ्या भावाचा खून करणाऱ्या लहान भावासह चौघा जणांना घटप्रभा पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी बुधवारी यासंबंधीची माहिती दिली आहे. खुनाच्या महिन्यानंतर आरोपींना अटक झाली असून खून झालेला युवक व आरोपी कल्लोळी येथील राहणारे आहेत. दि. 7 नोव्हेंबर रोजी कल्लोळी येथील शंकर संगटी यांच्या जमिनीशेजारी सुमारे 30 ते 35 वर्षीय अनोळखीचा मृतदेह आढळून आला होता. घटप्रभा पोलीस स्थानकात अनैसर्गिक मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली होती. सुरुवातीला तर पोलिसांनी प्रयत्न करूनही मृतदेहाची ओळखही पटवता आली नाही. घटप्रभाचे पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला, उपनिरीक्षक एस. आर. कणवी, एच. के. नरळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आहे. खून झालेला युवक कल्लोळी येथील असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हणमंत गोपाल तळवार (30) असे त्याचे नाव आहे.
मृतदेहाची ओळख पटल्यानंतरही या प्रकरणाचा तपास पुढे सरकत नव्हता. पोलिसांनी केलेल्या स्थानिक चौकशीत खून झालेल्या हणमंतच्या भावासह चौघा जणांनी गाव सोडल्याची माहिती मिळाली. हणमंतचा लहान भाऊ बसाप्पा गोपाल तळवार (वय 28), सचिन कंटेन्नावर (वय 25), इराप्पा हडगीनाळ (वय 32) तिघेही रा. कल्लोळी, बापू शेख (वय 34) रा. मुडलगी यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. खून झालेल्या हणमंत तळवार या युवकाच्या नावे सुमारे 50 लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता. नॉमिनी म्हणून हणमंतचा भाऊ बसाप्पाचे नाव घालण्यात आले होते. भावाचा काटा काढल्यास विम्याची रक्कम आपल्यालाच मिळणार, या आशेने आपल्या मित्रांना सोबत घेऊन बसाप्पाने मोठ्या भावाचा खून करून मृतदेह ओळख पटू नये, अशा अवस्थेत टाकून दिला होता. घटप्रभा पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला.









