प्रतिनिधी/ बेंगळूर
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान दिलेल्या राज्यातील लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा काँग्रेस अपमान करत आहे. काँग्रेसने देशातील जनतेला आपापसात भांडायला प्रवृत्त केले. देशात जातीय तेढ निर्माण करण्याची कोणतीही संधी सोडली नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी म्हैसूरच्या नंजनगूड येथील सभेत काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेस पक्षाची तुलना ‘तुकडे तुकडे गँग’शी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष कर्नाटकाला भारतापासून वेगळे करण्याचे उघडपणे प्रतिपादन करत असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या राजघराण्याने कर्नाटकच्या सार्वभौमत्वाचे त्यांना रक्षण करायचे आहे. यांचाच अर्थ ते उघडपणे कर्नाटकाला भारतापासून वेगळे करण्याचे समर्थन करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
भाजप सरकारकडून 30 लाख रोजगार
तत्पूर्वी शिमोगा जिल्ह्यातील आयनूर येथील प्रचारसभेत बोलताना मोदींनी राज्यात भाजप सरकारने 30 लाख रोजगार निर्माण केले आहेत. भाजपला सत्ता मिळाल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. आपल्या सरकारने 300 पेक्षा अधिक वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत, असे ते म्हणाले. कर्नाटकात कोठेही गेले तरी भाजपला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे राज्यात भाजप सत्तेवर येईल, यात शंका नाही, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.









