राज्यात 47 हजार सरकारी शाळा, 1,200 सरकारी पदवीपूर्व महाविद्यालये
प्रतिनिधी/ बेंगळूर
तालुका आणि राज्यपातळीवर शिक्षण खात्याच्या प्रत्येक अधिकाऱयाने राज्यात एक पदवीपूर्व महाविद्यालय आणि सरकारी शाळा दत्तक घ्यावी, अशी सूचना शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मुख्य सचिव एस. सेल्वकुमार यांनी दिली आहे. ही सूचना केवळ शिक्षण खातेच नव्हे तर तालुका आणि राज्य पातळीवरील अधिकाऱयांनाही लागू असणार आहे.
दत्तक घेतलेल्या शाळा किंवा पदवीपूर्व महाविद्यालयांचा शैक्षणिक विकास आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने परिश्रम घ्यावेत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात 47 हजार सरकारी शाळा आणि 1,200 सरकारी पदवीपूर्व महाविद्यालये आहेत. शाळा दत्तक घेतलेल्या संस्थांना अधिकाऱयांनी महिन्यातून एकदा किंवा दोनदा भेट द्यावी. यावेळी शैक्षणिक प्रगतीचा आढावा घ्यावा. तसेच योग्य सूचना कराव्यात. विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, त्यांची आवड-निवड जाणून घ्यावी आणि विद्यार्थ्यांना जीवनातील ध्येय निश्चित करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
दरमहा खात्याकडे अहवाल सादर करणार
शिक्षण खात्याचे आयुक्त आणि सार्वजनिक शिक्षण खात्याचे संचालक व इतर वरिष्ठ अधिकारी शिक्षण संस्था दत्तक घेण्यासाठी त्यांचे वाटप करणार आहे. दत्तक घेण्यासाठी वाटप केलेल्या शाळांपैकी बहुतेक शाळा ग्रामीण भागातील असणार आहेत. जिल्हा पातळीवर शिक्षण खाते पदवीपूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक आणि इतर अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम करणार असून दरमहा खात्याकडे अहवाल सादर करणार आहे.









