17 नोव्हेंबरपर्यंत नव्या पाईपलाईनवरुन कनेक्शन घेण्याची सूचना
कोल्हापूर : शहरात अमृत योजनेतंर्गत टाकण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या नव्या पाईपलाईनवरुन पाणी कनेक्शन घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. जुन्या पाईपलाईनद्वारे होणार पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याने १७ नोव्हेंबरपर्यंत नव्या पाईपलाईनवरुन कनेक्शन घेण्याची सूचना पाणीपुरवठा विभागाकडून केली आहे.
कोल्हापूर शहरात अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामांतर्गत काही भागांमध्ये नवीन
पाण्याच्या लाईन्स टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये काही भागांमध्ये नवीन टाकलेल्या पाण्याच्या लाईन्स व जुन्या पाण्याच्या लाईन्समधून एकत्रित पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे योग्य त्या दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे अमृत योजनेअंतर्गत नवीन टाकलेल्या पाईपलाईनवर जुन्या पाईपलाईनची कनेक्शन शिफ्ट करणे आवश्यक आहे. जुन्या लाईनवरील पाणीपुरवठा काही दिवसात बंद येणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी नवीन पाईपलाईन व जुनी पाईपलाईन सुरू आहे अशा ठिकाणी फक्त नवीन पाईपलाईन पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. तर जुनी पाईपलाईन बंद करण्यात येणार आहे.
त्यामुळे ज्या नळ कनेक्शनधारकांची नळ कनेक्शन अदयापही जुन्या पाईपलाईनवर आहेत, त्यांनी नळकनेक्शन अमृत योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या नवीन पाईपलाईन्स एक महिन्याच्या आत शिफ्ट करावीत. यानंतर जुनी पाईपलाईन बंद केल्यानंतर नळाचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद होणार आहे. नळ कनेक्शन अमृत योजनेच्या पाईपलाईनवर ट्रान्सफर करुन घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.








