उपजिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कारणे दाखवा नोटीस’
काणकोण : पैंगीण पंचायत क्षेत्रातील वापे, सादोळशे येथील अवैध डोंगरकापणी तसेच विनापरवाना करण्यात आलेल्या बांधकामाच्या विरोधात भूमहसूल कायद्याच्या 30 व्या कलमाखाली राज शशिभूषण पांडये उर्फ स्वामी ऋषिराज यांना काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच सध्या जे काम त्या ठिकाणी चालू आहे ते बंद करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात 7 जून रोजी दुपारी 3 वा. उपजिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आलेल्या सुनावणीसाठी त्यांना बोलावण्यात आले आहे. यासंबंधीची तक्रार पैंगीण पंचायतीकडून आल्यानंतर काणकोणच्या मामलेदार कार्यालयातील पथकाने या जागेची पाहणी केली असता वापे येथील सर्व्हे क्र. 233/5 या जमिनीवर विनापरवाना 3 बांधकामे उभारण्यात आली असल्याचे दिसून आले होते. त्याचबरोबर सर्व्हे क्र. 247/26 या जमिनीत एक बांधकाम करण्यात आल्याचे दिसून आले होते. आश्रमच्या नावाखाली या जमिनीत मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी करण्यात आलेली असून स्थानिक पंचायत आणि अन्य संबंधित यंत्रणांची परवानगी न घेता या ठिकाणी रस्ते तयार करण्यात आले आहेत. तसेच वन खात्याची परवानगी न घेता या ठिकाणची 30 पेक्षा अधिक झाडे तोडण्यात आली आहेत, असा आरोप नुकत्याच झालेल्या पैंगीण पंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांकडून करण्यात आला होता आणि या प्रकरणी पंचायतीने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. स्थानिक पंच शिल्पा प्रभुगावकर यांनी यासंबंधी सर्वप्रथम आवाज उठविला होता. पैंगीण पंचायतीच्या सरपंच सविता तवडकर यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन चौकशी करण्यात यावी अशी मागणी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे केल्यानंतर उपजिल्हाधिकारी गावकर यांनी 15 मे रोजी वरील नोटीस बजावली आहे.









