खानापुरात पंच गॅरंटी कमिटीची बैठक : विविध विषयांवर चर्चा
वार्ताहर/नंदगड
राज्यसरकारने जनतेसाठी पंच गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. या गॅरंटी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना पंच गॅरंटी योजनेच्या बैठकीत अधिकाऱ्यांना करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंच गॅरंटी तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते. खानापूर तालुका पंचायतीच्या सभागृहात पंच गॅरंटी कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. खानापूर तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी रमेश मैत्री होते. सदस्य प्रकाश मादार यांनी जनतेच्या तक्रारी बैठकीत मांडल्या. तालुक्यात रेशन दुकानातील भोंगळ कारभाराबद्दल तक्रारी मांडण्यात आल्या. याबाबत अन्न नागरी पुरवठा अधिकाऱ्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना योग्य सूचना द्याव्यात, असे सांगण्यात आले.
गृहज्योती अंतर्गत 200 युनिटपेक्षा कमी वीज वापरण्यात येणाऱ्या कुटुंबांना मोफत वीज पुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील 61533 कुटुंब लाभ घेत असल्याचे हेस्कॉम अधिकाऱ्यानी सांगितले. नंदगड-रायापूर येथील ट्रान्स्फॉर्मरची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी सूचना सदस्य बाबू हत्तरवाड यांनी केली. खानापूर तालुक्यात 60,447 महिलांना गृहलक्ष्मी योजनेचा लाभ झाला असल्याची माहिती महिला व बाल कल्याण खात्याच्या कर्मचाऱ्यांनी दिली. महिला बाल कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना बैठकीत उपस्थित राहण्यासाठी सूचना करण्यात आली. तालुक्यात दुर्गम भाग तसेच विस्ताराने मोठा असल्याने दळणवळणासाठी आणखी दहा बसेस खानापूर आगाराला द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विविध खात्यांचे अधिकारी व पंच गॅरंटी कमिटीचे सभासद उपस्थित होते. बैठकीत अन्य विषयांवर चर्चा झाली.









