वार्ताहर/नंदगड
राज्यातील काँग्रेस सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जनतेसाठी गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य योजना, शक्ती योजना, युवा निधी आदी योजना गेल्या काही दिवसांपासून सुरू केल्या आहेत. या योजना लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी सरकारने ही योजना प्रभावीपणे राबवली जावी म्हणून राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कमिटीची स्थापना केली आहे. गॅरंटी अनुष्ठान योजनेचे राज्याध्यक्ष म्हणून एच. एम. रेवण्णा यांची निवड झाली आहे. त्यांनी यापूर्वी मंत्री म्हणून काम करत असताना संगोळ्ळी रायण्णा समाधीस्थळाच्या विकासासाठी प्रयत्न केले होते. अद्यापही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मंत्री शिवराज तंगडगी नंदगडला येणार असल्याने आपली उपस्थिती दर्शवली.
रेवण्णा यांनी मंत्री तंगडगी यांच्याबरोबर रायण्णा यांच्या समाधीस्थळाची व फाशीस्थळाची पाहणी केली. व संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. त्यापूर्वी खानापूर तालुका गॅरंटी योजनेचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, प्रकाश मादार, इसाक पठाण, शांताराम गुरव, रुद्रापा पाटील व इतरांनी त्यांची भेट घेतली. दरम्यान एच. एम. रेवण्णा यांनी खानापूर तालुक्यातील गावागावात तालुका कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, याबाबतची माहिती शिबिराद्वारे द्यावी, अशी सूचना केली. खानापूर तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री यांनी खानापुरात गॅरंटी अनुष्ठान कमिटीची वारंवार बैठक घेत असल्याने त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. इतर तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग दर्शवून कमिटीला प्रगतीबाबत माहिती द्यावी. व जनतेपर्यंत योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.









