जम्मू-काश्मीरच्या सुरक्षास्थितीवरून उच्चस्तरीय बैठक : अमित शाह यांनी घेतला आढावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा स्थितीवरून दिल्लीत बुधवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी लढाई तीव्र करत घुसखोरी पूर्णपणे रोखण्याचा निर्देश दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाच्या उच्चाटनासाठी प्रतिबद्ध असल्याचे शाह यांनी उच्चस्तरीय समीक्षा बैठकीला संबोधित करताना म्हटले आहे. या बैठकीत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकासमवेत गृह मंत्रालय आणि जम्मू-काश्मी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाग घेतला आहे.
मोदी सरकारच्या निरंतर प्रयत्नांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाची इकोसिस्टीम कमकुवत झाली आहे. आमचे लक्ष्य दहशतवाद्यांचे अस्तित्व समूळ नष्ट करणे आहे. अमली पदार्थांच्या तस्करीतून होणारे टेरर फंडिंग कठोरपणे रोखण्यात यावे असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
सैन्यप्रमुखांसोबत समीक्षा बैठक
गृहमंत्री शाह यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा स्थितीवरून एक समीक्षा बैठकघेतली होती, ज्यात सैन्यप्रमुख उपेंद्र द्विवेदी, केंद्रीय गृह सचिव समवेत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता. या बैठका दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात माजी सैनिक मंजूर अहमद वागे यांचा मृत्यू झाला होता तर त्यांची पत्नी अन् भाची जखमी झाली होती. गृहमंत्र्यांनी सुरक्षा यंत्रणांना नव्या फौजदारी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीतील पदांवर नियुक्ती करण्याचा निर्देश दिला. सुरक्षा यंत्रणांनी सतर्क रहावे आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपविण्यासाठी ताळमेळ राखून काम करणे जारी ठेवण्याचा निर्देशही त्यांनी दिला आहे.









