लोकायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून तपासणी
खानापूर : बेळगाव जिल्हा लोकायुक्त कार्यालयातील डीवायएसपी बी. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकायुक्त कार्यालयातील दहा कर्मचाऱ्यांनी खानापूर तहसीलदार कार्यालयाच्या सर्व विभागाची तपासणी करून कामकाजातील त्रुटी विषयी तसेच सामान्य नागरिकांची कामे वेळेत करण्यात यावीत अशा सूचना तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. बेंगळूर लोकायुक्ताच्या सूचनेप्रमाणे तालुका कार्यालयातील नागरिकांच्या समस्या योग्य प्रकारे हाताळण्यात येतात की नाही. तसेच शासकीय कामे वेळेत पूर्ण करण्यात येतात की नाही याची पाहणी करून अहवाल देण्याची सूचना बेंगळूर राज्य लोकायुक्ताने केली आहे.
त्या अनुषंगाने बेळगाव जिल्हा लोकायुक्तांच्या पथकाने सोमवारी खानापूर तहसीलदार कार्यालयात अचानक भेट देऊन सर्व विभागाची पाहणी केली. तसेच विविध कागदपत्रांची तपासणी केली. नागरिकांच्या आलेल्या अर्जाची आणि इतर कामांची सखोल तपासणी केली तसेच नागरिकांच्या समस्या तसेच त्यांनी केलेल्या अर्जाचा निपटारा वेळेत करण्यात यावा, नागरिकांना शासकीय कामात नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना यावेळी लोकायुक्त डीवायएसपी बी. एस. पाटील यांनी केल्या. तहसीलदार कार्यालयातील सर्व विभागाच्या फाईल्सची तपासणी यावेळी करण्यात आली. भेटीवेळी तहसीलदार दुंडाप्पा कोमार यासह इतर विभागाचे कर्मचारी आणि उपतहसीलदार उपस्थित होते.









