राज्याच्या नगरपंचायतीच्या सचिवांकडून महापालिका अधिकाऱ्यांना आदेश
बेळगाव : शहरातील कचऱ्याची उचल वेळेत करा. शहर स्वच्छ ठेवा, अशी सूचना राज्याच्या नगरपंचायतीच्या सचिवांनी तसेच केंद्रीय विभागाच्या साहाय्यक सचिवांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केली आहे. भारत सरकारच्यावतीने स्वच्छ अभियान राबविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहे. त्याला महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींनी सहकार्य करणे गरजेचेआहे. त्यासाठी प्रत्येकांनी नियोजन करूनच काम करावे, असे सांगण्यात आले. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी यावेळी शहर स्वच्छतेबाबत केलेल्या उपक्रमांची माहिती राज्याच्या नगरपंचायतीच्या सचिवांना दिली.
नागरिकांमध्ये जागृती करा
यावेळी काही सूचना करण्यात आल्या आहेत. स्वच्छ अभियान राबविताना त्याची जनजागृती करा, जनतेमध्ये अधिक जागृती झाली तरच शहर स्वच्छ राहू शकते. त्यासाठी विविध प्रकारे जागृती मोहीम राबवून संपूर्ण शहर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करा, असे सचिवांनी सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्सला महापालिकेचे उपायुक्त, आरोग्याधिकारी, आरोग्य निरीक्षक आदी उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्स झाल्यानंतर तातडीने मनपा आयुक्तांनीही अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या आहेत.









