महिला आयोगाच्या राज्य अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी : जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी साधला संवाद
बेळगाव : महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन महिला आयोगाकडून पोलीस खाते, जिल्हा प्रशासन, महिला आणि बाल कल्याण खाते, समाज कल्याण खाते या माध्यमातून महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर महिला वसतिगृहांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा व्यवस्था व शाळा-महाविद्यालयांमध्ये कायद्याबाबत जागृती करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. महिलांकडून आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन पोलीस खात्याने सहकार्य करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी यांनी दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
पुढे त्या म्हणाल्या, गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यासह बेळगाव शहर व ग्रामीण भागामध्ये प्रवास केला असून महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. सौंदत्ती तालुक्यातील महिलांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. तर बिम्स रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालय, विद्यार्थी वसतिगृह, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आदी ठिकाणी पाहणी करण्यात आली. यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये सुविधा उपलब्ध नसल्याचे आढळून आले असून याबाबत बिम्स अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे, वसतिगृहातील व्यवस्था याबाबतचा अहवाल देण्यासाठी बिम्स संचालकांना सांगण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. सौंदत्ती तालुक्यातील देवदासींची भेट घेऊन त्यांच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती देण्यात आली आहे. महिला उद्योजकांच्या प्रोत्साहनासाठी हाती घेण्यात आलेले उपक्रम व त्यांची अंमलबजावणी जाणून घेण्यात आली असून जि. पं. कडून यासाठी विशेष परिश्रम घेतले असल्याचे दिसून आले आहे. अंगणवाडी व तालुका रुग्णालयाची पाहणी करण्यात आली असून वैद्यकीय सुविधा पुरविण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रुप डी महिला कर्मचाऱ्यांना कामगार कायद्यानुसार वेतन देण्यात येत नसल्याची बाब निदर्शनास आली असून संबंधित कंत्राटी कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे.
नियमानुसार वेतन देण्याची ताकीद देण्यात आली आहे. समाज कल्याण खात्याच्या वसतिगृह व तेथील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, वर्किंग वुमन्स हॉस्टेल याठिकाणचीही पाहणी करण्यात आली. महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक असणाऱ्या उपाययोजना हाती घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये पोक्सो अंतर्गत 30 प्रकरणांची नोंद झाली आहे. तर बालविवाहाची 16 प्रकरणांची नोंद झाली आहेत. निर्भया 13, सखी केंद्रामध्ये 31 प्रकरणांची नोंद झाली आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात 90 प्रकरणांची नोंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस खाते व इतर खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महिलांच्या सुरक्षेबाबत कडक सूचना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न
शहरासह मध्यवर्ती बसस्थानक आदी ठिकाणी महिला स्वच्छतागृहांची आवश्यकता असून याबाबत मनपाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. दरम्यान, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.









