पुणे / प्रतिनिधी :
कर्नाटकचे मुख्यमंत्री सतत वादग्रस्त विधाने करून दोन्ही राज्यात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारची विधान करीत आहेत. यामुळे दोन्ही राज्यातील वातावरण कलुषित होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक घेऊन चर्चा केली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्यापपर्यंत आलेली नाही. खरेतर मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटीला जाण्यापेक्षा दिल्लीत जाऊन आपल्या राज्याची भूमिका मांडायला हवी, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
याबाबत बोलताना थोरात म्हणाले, भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली जातात. कालच चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. निवडणुका आल्या, की भाजपच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची आठवण होते. त्यांच्या नावावर मते मागितली जातात. पण निवडून आल्यानंतर अशा प्रकारची विधाने केली जातात. या सर्व नेत्यांचा आम्ही निषेध करतो.
अधिक वाचा : चंद्रकांत पाटील शाईफेकप्रकरणी 11 पोलीस निलंबित
चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले, ते पाहिल्यानंतर त्यांचे भान हरपले आहे, हे लक्षात येते. आम्ही त्यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करीत आहोत. आपण अशा नेत्यांना धडा शिकवला पाहिजे, असे मतही थोरात यांनी नोंदविले.