भाजप नेत्यांचे काँग्रेसला आव्हान, अन्यथा कारवाईचे संकेत
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वामुळे आज राज्यात अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. नोकऱ्या देताना कुणी पैसे घेत असेल, तर त्याविषयी मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका आहे. नोकऱ्यांच्या नावाखाली पैसे घेणाऱ्या संशयितांस मुख्यमंत्र्यांनीच स्वत: पकडून दिले आहे. तरीही मुख्यमंत्री सावंत यांच्या कुटुंबीयांवर संशय घेऊन विरोधक गंभीर आरोप करीत आहेत. हे गंभीर आरोप करण्याऐवजी एकतरी पुरावा सादर करावा, असे खुले आव्हान समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले आहे.
भाजप कार्यालयात काल सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत फळदेसाई यांनी सांगितले की, विरोधकांनी यापुढे बिनबुडाचे आरोप करण्याचे थांबवले नाही तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यावेळी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, आमदार केदार नाईक व गिरीराज पै वेर्णेकर उपस्थित होते. मंत्री फळदेसाई म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी नोकरीसाठी रोख रकमेच्या घोटाळ्याप्रकरणी जे केले ते कोणताही मुख्यमंत्री करू शकला नाही. या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे. विरोधकांकडून वैयक्तिक टीका होत असतानाही मुख्यमंत्री सावंत यांनी भ्रष्टाचार आणि नोकरीसाठी रोख घोटाळ्यात सामील असलेल्यांवर कारवाई करण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला.
काँग्रेसच्या पराभवाने विरोधक हताश
आमदार आमोणकर म्हणाले, हरियाणा आणि महाराष्ट्र राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यामुळे विरोधी पक्षनेते हताश झाले आहेत. आगामी निवडणुकीतही गोव्यात विरोधकांना पराभव दिसू लागल्यानेच ते सरकारवर आरोप करीत आहेत. काँग्रेसकडे कोणताच मुद्दा नसल्याने ते नोकऱ्या आणि जमीन घोटाळ्याचे मुद्दे पुराव्याशिवाय पुढे करीत आहेत. पुरावे सादर करूनच विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करायला हवेत, असेही ते म्हणाले. गिरीराज पै वेर्णेकर यांनी सर्व विरोधी पक्षांना निराधार विधाने करण्याबाबत इशारा देताना सांगितले की,विरोधकांनी सरकारविरोधात वक्तव्ये करत राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाजप पक्ष सर्व संभाव्य पर्यायांचा शोध घेईल. प्रसंगी कायदेशीर कारवाई करण्याबाबतही विचार केला जाईल.
‘फातोर्डा ते लंडन’ व्यवहारावरही बोला
फातोर्डा ते लंडन या मार्गे 100 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. ह्या गोष्टी जनतेला कळू नयेत म्हणून विरोधक सरकारवर नोकर भरतीत पैशांची देवाण-घेवाण होत असलेला आरोप पुराव्याशिवाय करीत आहे. हे करण्याऐवजी फातोर्डा ते लंडन ह्या 100 कोटींच्या व्यवहारावर बोलावे, असे आवाहन गिरीराज पै वेर्णेकर यांनी आमदार विजय सरदेसाई यांचे नाव न घेता केले.
उघडे पितळ झाकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
काँग्रेसचाच आमदार मॉर्फ केलेल्या व्हिडियोत असल्याने ही प्रकरणे जनतेसमोर येऊ नयेत, यासाठी काँग्रेस पक्ष व विरोधक आटापिटा करीत आहे. खुद्द आमदारानेच याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्याने हे प्रकरण उजेडात आले आहे. भाजपने हे प्रकरण बाहेर काढलेले नाही. या मॉर्फ केलेल्या व्हिडियोत काँग्रेसचाच आमदार गुंतला असल्याने काँग्रेसने सरकारवर आरोप करण्यापूर्वी या प्रश्नावर बोलायला हवे होते. परंतु आमदाराचे उघडे पितळ झाकण्यासाठीच काँग्रेस प्रयत्न करीत असल्याचा आरोप गिरीराज पै वैर्णेकर यांनी केला.









