‘ऑन डय़ुटी’ मृत्यू आलेल्यांच्या कुटुंबियांना प्राधान्य : मंत्रिमंडळाचा निर्णय, मुख्यमंत्र्यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
अकाली मृत्यू येणाऱया सरकारी कर्मचाऱयांच्या नातलगांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याच्या योजनेत किंचित बदल करण्यात आला असून एखाद्या कर्मचाऱयास डय़ुटीवर असताना अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू आल्यास त्याच्या नातलगांना यापुढे तत्काळ नोकरी देण्यात येणार आहे. असे अर्ज विनाविलंब निकाली काढण्यात यावे असा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत चौघांना नोकरी देण्यातही आली असून एकूण 12 अर्जांना मंजुरी दिली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
बोरी अपघातातील कर्मचाऱयांच्या कुटुंबियांना नोकरी
यापूर्वीच नोकरी देण्यात आलेल्यामध्ये बोरी येथे वीज खांब नेणारा ट्रक उलटून झालेल्या वीज कर्मचाऱयांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अभियंत्यांना मिळणार सरकारी कंत्राटे
मुख्यमंत्री रोजगार योजनेंतर्गत (सीएमआरव्हाय) अभियांत्रिकी पदवीधारकांना सरकारी कंत्राटे मिळविता येणार आहेत. ही योजना आता अभियंत्यांसाठी खुली करण्यात आली आहे. त्याअंतर्गत डिप्लोमा आणि पदवीधारकांना स्वतंत्ररित्या सरकारी कंत्राटांसाठी बोली लावता येणार आहे. असे प्रकल्प हाती घेणाऱया अभियंत्यांना आर्थिक विकास महामंडळातर्फे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. डिप्लोमाधारक 5 लाख रुपयांपर्यंत तर पदवीधारक 10 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी बोली लावू शकतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
अधिकाऱयांचा निष्काळजीपणा खपवून घेणार नाही
हल्लीच राज्यात गाजलेल्या नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातील कोटय़वधींचे धान्य सडून नुकसानी झालेल्या प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली असून यापुढे अधिकाऱयांचा अशाप्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेणार नाही. कोणतीही गय न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. गोदामांची दुर्दशा झाल्यामुळे धान्य खराब झाले ही सबब न पटण्यासारखी असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
बार्देश मामलेदारांची चौकशी चालt
राज्यात सध्या गाजणाऱया जमीन बळकाव प्रकरणात राजकीय व्यक्तींचा हात असल्याच्या अफवांसंबंधी विचारले असता, बार्देश मामलेदारांची चौकशी चालू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच याप्रश्नी लवकरच स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आपण आणखी काही गोष्टी उघड करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शॅक परवान्यांना वर्षभराची मुदतवाढ
किनाऱयांवर शॅक चालविणाऱयांना मोठा दिलासा देत मंत्रिमंडळाने विद्यमान शॅक परवान्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. यंदा मे महिन्यातच पर्यटन शॅक धोरणाची तीन वर्षांची वैधता संपुष्टात आली होती. त्यामुळे सध्याच्या शॅक परवान्यांना 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या प्रभावामुळे गत तीन वर्षात शॅकमालकांना प्रचंड नुकसानी सहन करावी लागली होती. त्यामुळे शॅक्ससाठी लागणाऱया फी संरचनेत सूट देण्याची मागणी त्यांनी केली होती.
फोगट मृत्यूप्रकरणी कसून चौकशीचे आदेश
प्रसिद्ध अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या संशयास्पद मृत्यूवरून गोव्याची देशभरात बदनामी झाली आहे. त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, हे प्रकरण उजेडात येताच आपण तत्काळ पोलीस महासंचालकांशी चर्चा केली असून याप्रकरणी कसून चौकशी करण्यास सांगितले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विविध खर्चांना मंजुरी
दरम्यान, बुधवारच्या बैठकीत मंत्रिमंडळाने मोपा विमानतळ प्राधिकरणात नियुक्त्यांसाठी काही पदांना मंजुरी दिली. त्याशिवाय पॅरा शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निकालात काढण्याचे ठरविण्यात आले. तसेच स्वातंत्र्यदिन कार्यक्रमावर झालेला 11 लाख रुपये खर्च आणि काही नियुक्त्यांना मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.