प्रतिनिधी/ बेळगाव
नव्याने दाखल झालेले विजेचे स्मार्ट मीटर शनिवारपासून कार्यान्वित करण्याचे काम सुरू झाले. सिंधी कॉलनी हिंडलगा रोड येथे पहिला थ्रीफेज मीटर बसविण्यात आला. तसेच ग्राहकांना अॅप्लिकेशन देण्यात येत असून यामुळे रिचार्ज किती आहे याची माहिती मिळत आहे.
राज्यात सर्वत्र नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. ऊर्जा विभागाच्या सूचनेनुसार बेळगावमध्येही हे मीटर दाखल झाले आहेत. जीपीएस यंत्रणेचा वापर करून हे मीटर बसविण्यात येणार आहेत. या मीटरला वीज बिलाऐवजी मोबाईलप्रमाणे रिचार्ज करावे लागणार आहे. मोबाईलप्रमाणेच रिचार्ज संपायला आल्यानंतर ग्राहकाला रिमाईंड दिला जाणार आहे. तसेच अॅप्लिकेशनच्या माध्यमातून रिचार्जही करता येणार आहे. शनिवारी सिंधी कॉलनी येथे हेस्कॉमचे अधिकारी कलीमुल्ला यांच्या उपस्थितीत मीटर बसविण्याचा शुभारंभ झाला. ग्राहकांना अद्याप या मीटरविषयी तितकीशी माहिती नसल्याने त्यांना याबाबतची माहिती करून देण्यात आली. यावेळी हेस्कॉमचे कर्मचारी उपस्थित होते.









