स्वागतासाठी शहर सज्ज : उत्साही वातावरण
प्रतिनिधी /बेळगाव
उत्साहाला उधाण, खरेदीचा आनंद आणि गर्दीचा उच्चांक असे स्वागतार्ह चित्र मंगळवारी पहायला मिळाले. गणेशोत्सवासाठी सर्वत्र खरेदीला उधाण आल्याने अनेक दिवसांनी केवळ खरेदीसाठी बाजारपेठेत जनसागर लोटल्याचे पहायला मिळाले. गणेशाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले असून आज बाप्पांची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
कोरोनाचे विघ्न टळल्यानंतर विघ्नहर्ता आणि बुध्दीची देवता असणाऱया गणरायाच्या स्वागतामध्ये कोणतीही कसूर राहू नये यासाठी भक्तगण तत्पर आहेत. तर दोन वर्षांनंतर सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सव साजरा करण्याचा आनंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना झाल्याने त्यांनी यंदा जय्यत तयारी केली आहे. विघ्नहर्त्याने कोरोनाचे संकट दूर केले तसे आता बिबटय़ाची समस्याही विघ्नहर्त्या गणरायाने दूर करावी,
अशीच प्रार्थना सर्वजण करत आहेत. भक्तांच्या हाकेला गणराय धाऊन येईल, अशीही अपेक्षा आहे. दरम्यान उत्सव शांततेने साजरा व्हावा यासाठी प्रशासनही सज्ज आहे. पोलीस प्रशासनाच्या वरि÷ अधिकाऱयांनी यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पथसंचलन सुरू केले असून मंगळवारी सकाळी एडीजीपी आलोककुमार यांनी अधिकाऱयांसह शहराच्या विविध भागात फेरफटकाही मारला.
दोन वर्षांनंतर उत्सव होणार असल्याने त्याचा आनंद अधिक आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराविना दहा दिवस हा आनंद असाच वृध्दींगत व्हावा अशीच प्रार्थना गणरायाकडे केली जात आहे.









