आकर्षक अशी धर्मवीर संभाजी महाराजांची मूर्ती.
प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक येथे धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रारंभी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला.
या मिरवणुकीमध्ये ढोल पथक, लेझीम, लाठीमेळा, घोडेस्वार यांचा सहभाग होता. अनगोळ नाका येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. धर्मवीर संभाजी चौक येथे रात्री उशिरा मिरवणूक पोहोचली. त्यानंतर व्रेनच्या साहाय्याने चौथऱ्यावर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सदर मूर्ती धातूची असून 16 फूट उंच आहे. अनगोळ येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार विक्रम पाटील यांनी ही मूर्ती तयार केली आहे. अनगोळमधील युवक, महिला, शिवशंभू भक्त मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाले होते. धर्मवीर संभाजी चौक येथे आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. चौथऱ्याचे सुशोभिकरण करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.









