गर्दीतून बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाल्याने गैरसोय : ढिसाळ नियोजनामुळे नाराजी
बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या शिवभक्तांची अडचण होऊ नये, यासाठी बॅरिकेड्स लावले जातात. यावर्षी मात्र पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे या बॅरिकेड्समुळे सुविधेपेक्षा अडचणींचाच सामना जास्त करावा लागला. काही ठिकाणी गर्दी झाल्यास तेथून बाहेर पडण्यासाठी असलेल्या गल्ली-बोळांमध्येही बॅरिकेड्स लावण्यात आल्याने शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली. केळकर बाग, हुतात्मा चौक, कडोलकर गल्ली कॉर्नर, अनसूरकर गल्ली, काकतीवेस गणाचारी गल्ली कॉर्नर, समादेवी गल्ली या परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले. दुचाकी वाहने मिरवणुकीच्या मुख्य मार्गापर्यंत येऊ नयेत यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आल्याचे उत्तर पोलिसांकडून देण्यात आले. प्रत्यक्षात मात्र या बॅरिकेड्समुळे शिवभक्तांची गैरसोयच अधिक झाली.
शिवभक्तांमधून नाराजी
रात्री सर्वाधिक गर्दी गणपत गल्ली, रामदेव गल्ली व समादेवी गल्ली या परिसरात होते. एकाचवेळी गर्दी झाल्यानंतर नागरिकांना इतरत्र जाण्यासाठी लहान गल्ल्या व बोळ महत्त्वाचे ठरतात. परंतु, त्याच बोळांमध्ये दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावण्यात आल्याने नागरिकांना ये-जा करणे अशक्य झाले. या बॅरिकेड्समुळे गर्दीत अधिक भर पडल्याची तक्रार शिवभक्तांमधून व्यक्त करण्यात येत होती.









