जलाभिषेक घालून विधिवत पूजन
सांगरूळ /वार्ताहर
सांगरूळ ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली . प्रतिष्ठापणे नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक घालण्यात आला.
सांगरूळ ग्रामपंचायत च्या मुख्य चौकात पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा छबुतरावरील अर्ध पुतळा होता .कालांतराने हा पुतळा खराब झाल्याने या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा अशी ग्रामस्थांची इच्छा होती .या पार्श्वभूमीवर सध्याच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रॉझ धातूपासून बनवलेला शिवरायांचा नवीन अश्वारूढ पुतळा बसविण्याचा निर्णय घेऊन तो पूर्णत्वास नेला .ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करून जलाभिषेक करण्यात आला .
पुतळ्याची उभारणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या सहज नजरेत भरण्यासारखी आहे. छत्रपतींच्या रुबाबदार व आकर्षक पुतळ्यामुळे चौकाच्या सौंदर्यात भर पडली आहे . यामुळे ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त होत आहे .
सुरुवातीस संदिप स्वामी व सौरव स्वामी यांनी मंत्र पठण करत संदीप जंगम स्मिता जंगम यांच्या हस्ते विधिवत पूजा केली . यानंतर गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे व गावातील सर्व तरुण मंडळांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते शिव पुतळ्यास भगवा शेला व कमरपट्टा घालून जलाभिषेक करण्यात आला .यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी शिव पुतळ्यास जलाभिषेक घालून वंदन केले .
यावेळी बोलताना गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी सांगरुळच्या मुख्य चौकात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आजच्या पिढीला चांगले आचार , विचार आणि चांगल्या संस्काराची प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त केला.तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांच्या इच्छाशक्तीची पूर्तता केल्याने मनस्वी समाधान होत असल्याचे सांगितले .
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णात खाडे करवीरच्या माजी सभापती सीमा चाबूक सरपंच शितल खाडे उपसरपंच उज्वला लोंढे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य पांडुरंग सेवा संस्थेचे पदाधिकारी व सदस्य दुध संस्थांचे पदाधिकारी व संचालक तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील युवक प्रदोष मेटे हे ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्र म्हणत दररोज नियमितपणे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पूजा करत आहे .
शिवरायांच्या विचाराचा जागर
गावातील सर्व समाजाच्या जाती धर्माच्या आडनाव बंधूंच्यातील ज्येष्ठ व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या वतीने खास निमंत्रित करून त्यांच्या हस्ते जलाभिषेक करत छत्रपती शिवरायांच्या विचाराचा जागर करण्याचा प्रयत्न केला.
चौकाच्या वैभवात भर
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी करताना निवडलेली जागा, चबुतरा ,सभोवतालचे दगडी व ग्रीलचे कंपाउंड डिझाईन आणि ब्राँझ धातूपासून तयार केलेला घोड्यावरील पुतळा याचा उत्तम मिलाप साधल्याने पुतळ्याची आकर्षकता वाढल्याने ग्रामपंचायत चौकाच्या वैभवात भर पडली आहे