महापौरांनी केली सूचना
बेळगाव : शहापूर स्मशानभूमीतील कोसळलेले पत्र्याचे शेड उभारण्यासह खराब झालेल्या शवदाहिन्या तातडीने बसविण्यात याव्यात, अशी सूचना महापौर मंगेश पवार यांनी बुधवारी मनपा अधिकाऱ्यांना केली. सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. यापूर्वी झालेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे शहापूर स्मशानभूमीतील पत्र्याचे शेड कोसळून नुकसान झाले आहे. दुसऱ्या शेडमध्ये एका मृतदेहावर अंत्यविधी सुरू असताना बाजूचे दुसरे शेडही कोसळले होते. केवळ सुदैवानेच कोणतीही हानी झाली नाही. सध्या केवळ एकच शेडमध्ये मृतदेहावर अंत्यविधी केला जात आहे. बाहेरील शवदाहिन्यावर अंत्यविधी करताना पावसामुळे समस्या निर्माण होत आहे. त्याचबरोबर सध्या असलेल्या काही शवदाहिन्यादेखील खराब झाल्या आहेत. त्यामुळे मृतदेहांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी महापौर मंगेश पवार यांच्याकडे नागरिकांकडून केली जात होती.
काम तातडीने करण्याचे आवाहन
यापूर्वीही महापौर पवार यांनी शहापूर स्मशानभूमीला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भेट देऊन धोकादायक झाडे तोडण्याची सूचना केली होती. त्यानंतर बुधवारी महापौर मंगेश पवार, नगरसेवक गिरीश धोंगडी, नितीन जाधव यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहापूर स्मशानभूमीला भेट दिली. त्याचबरोबर तातडीने शेड उभारण्यासह नवीन शवदाहिन्यादेखील बसविण्यात याव्यात, तसेच सदर काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी सूचनाही अधिकाऱ्यांना करण्यात आली.









