या प्रकरणी ६ जणांना अटक
शिवाजीनगर पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल
इचलकरंजी
इंस्टाग्रामवरील मेसेजवरून सुरू झालेला वाद शेळके मळा येथे मारहाणीपर्यंत पोहोचला. या प्रकरणात दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी दगडफेक करत दहशत माजवणाऱ्या सहा जणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून त्यांना घटनास्थळी तपासासाठी फिरवण्यात आले.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, श्रेयश दिपक पोळ (वय २१, रा. अष्टविनायक कॉलनी) याच्या फिर्यादीवरून, संजय माने आणि संजय परीट (दोघेही रा. शेळके मळा) यांनी त्यांच्या नातलग मुलीला इंस्टाग्रामवर मेसेज केल्याच्या कारणावरून श्रेयशला बोलावून घेतले. यातून वाद वाढल्यावर दोघांनीही त्याला लाकडी बॅटने मारहाण केली. त्याच्या डोक्यावर, पाठीवर आणि डोळ्यावर गंभीर मार लागला असून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
या घटनेनंतर रात्री प्रतिकार म्हणून श्रेयश पोळ आणि त्याचे पाच ते सहा साथीदार तलवार आणि काठ्या घेऊन संजय माने यांच्या घरासमोर गेले. त्यांनी गल्लीतील पाणीपुरी गाड्यांचे नुकसान केले, घरावर दगडफेक केली आणि परिसरात दहशत माजवली, तसेच एका महिलेचा विनयभंग केला. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून दोन्ही गटांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली.
दरम्यान, परिसरात दगडफेक करत दहशत माजवणाऱ्या सागर लक्ष्मण गायकवाड (वय २०), समीर अल्लाबक्ष मणेर (वय १९, दोघेही रा. पोवार मळा), पार्थ प्रवीण कांबळे (वय १९ रा. कामगार चाळ), वैभव दिलीप कांबळे (वय २४ रा. दाते मळा), अविनाश रमेश कदम (वय २१), श्रेयस दीपक पोळ (वय २१ दोघेही रा. शेळके मळा) या संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्यांना घटनास्थळी तपासासाठी फिरवण्यात आले.
Previous Articleमत्स्य व्यवसायिकांनी योजनांचा लाभ घ्यावा
Next Article माजी आमदार सुभाष चव्हाण यांचे निधन








