कुडाळ :
येत्या 2 मार्च रोजी ‘पेडल फॉर हेल्थ–पेडल फॉर एनव्हायरमेंट’ या टॅगलाईनखाली सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन (ण्Aए) व कुडाळ सायकल क्लब (ख्ण्ण्) यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळमध्ये ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग-2025’ सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून नामांकित सायकलपटू तेही दोन लाख ते सोळा लाख ऊ. किंमतीच्या सायकलसह स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यंदाचे हे सातवे वर्ष आहे.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्था मैदान (एमआयडीसी–कुडाळ) येथे 2 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजता स्पर्धेचा शुभारंभ होईल. साठ किमीची ‘कोस्टल रोड रेस’ व 25 किमीची ‘फन राईड’ असे दोन प्रकार यात आहेत. कोस्टल राईड स्पर्धा पुऊष व महिला यांच्या चार गटांत होणार असून त्यासाठी लाखो ऊ.ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. दोन्ही प्रकारात जास्तीत–जास्त सायकलपटूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन व कुडाळ सायकल असोसिएशनने हॉटेल स्पाईस कोकण येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
कुडाळ सायकल क्लबचे अध्यक्ष रुपेश तेली, इव्हेंट चेअरमन शिवप्रसाद राणे, डॉ. बापू परब, गजानन कांदळगावकर, प्रथमेश सावंत, सचिन मदने, प्रमोद भोगटे, अमोल शिंदे, डॉ. सिद्धांत परब, डॉ. अमोघ चुबे आदी उपस्थित होते.
- नवीन सायकलपटूंसाठी 25 किमीची फन राईड
नवीन सायकलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी 25 किमीची फन राईड खुल्या वयोगटात होणार आहे. त्याचा मार्ग कुडाळ–एमआयडीसी ते वेंगुर्ले मठ तिठा आणि परत कुडाळ असा आहे. साठ किमीची कोस्टल राईड सायकल स्पर्धा महिला आणि पुऊषांसाठी दोन वयोगटात होणार आहे. 14 ते 40 वर्षे आणि 40 वर्षांवरील मास्टर वयोगट असे दोन वयोगट आहेत. स्पर्धेसाठी पारितोषिके अशी– पुरुष खुला वयोगट 14 ते 40 साठी प्रथम 21 हजार रु., द्वितीय 15 हजार, तृतीय 10 दहा हजार, महिला खुला वयोगट (14 ते 40) प्रथम 15 हजार, द्वितीय 10 हजार, तृतीय 7 हजार, मास्टर्स पुरुष गट वय 40 च्यावर प्रथम 12 हजार, द्वितीय 8 हजार, तृतीय 5 हजार, मास्टर्स महिला गट वय 40 च्यावर प्रथम 10 हजार, द्वितीय 5 हजार, तृतीय 3 हजार रु. व विजेत्या सर्वांना प्रत्येकी चषक देण्यात येईल. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत देशभरातून दीडशे नामांकित स्पर्धक त्यांच्या उच्च दर्जाच्या वेगवेगळ्या सायकलींसह सहभागी होणार आहेत.
- सर्व स्पर्धकांना हेल्मेट सक्तीचे
सर्व स्पर्धकांना हेल्मेट सक्तीचे आहे. स्पर्धेत सहभाग नोंदणीची मुदत 25 फेब्रुवारीपर्यंत असून प्रत्येक तालुक्यात विविध ठिकाणी नाव नोंदणीचे अर्ज ठेवण्यात आले आहेत. कुडाळमध्ये शिव एंटरप्रायझेस व इन्स्पायर सायकल (कुडाळ), परब हॉस्पिटल (सुकळवाड), कनिष्क झेरॉक्स (ओरोस), झांटये मेडिकल (कट्टा), जनाई मेडिकल (कणकवली), शहा सायकल स्टोअर्स (सावंतवाडी), शिवदत्त सावंत (वेंगुर्ले), रामचंद्र चव्हाण (मालवण), संकेत नाईक (दोडामार्ग), एम. पी. सायकल (देवगड), जयदीप पडवळ (शिरोडा) व संतोष टक्के (वैभववाडी) येथे नाव नोंदणी अर्ज ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना टी–शर्ट दिले जातील.
- भारतातील नामांकित सायकलिस्ट होणार सहभागी
सायकलिंग स्पर्धेत भारतातील नामांकित सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी 25 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन गजानन कांदळगावकर, रुपेश तेली व शिवप्रसाद राणे यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचे तसेच स्पर्धा पाहायला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








