मध्यवर्ती सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन : घटनेच्या प्रतीसह नूतन संसदगृहात प्रवेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जुन्या संसदसभागृहाने या देशाला खूप काही दिले आहे. आता त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्याला नव्या उत्साहात पुनरारंभ करायचा आहे. संसदेच्या नूतन सभागृहात आपण नव्या धारणेसह नव्याने कार्यसिद्ध झाले पाहिजे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात भाषण करताना काढले. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची ही जुन्या संसदगृहाच्या मध्यवर्ती सभागृहातील अंतिम बैठक होती. जुन्या संसदगृहाचे ‘संविधान भवन’ असे नामकरण करावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणात केली आहे.
आपल्या भाषणात त्यांनी संसदेत घडलेल्या अनेक घटनांचे स्मरण करुन दिले. या वास्तूने या देशाला किती कायदे दिले, किती चर्चा पार पडल्या, किती विदेशी अतिथींनी या गृहाला संबोधित केले, तसेच कोणती ऐतिहासिक विधेयके या गृहाने संमत करुन देशाचे भवितव्य घडविले, याचे पुनरावलोकन त्यांनी केले.

4,000 हून अधिक कायदे
या वास्तूला 1952 पासून आतापर्यंत 41 देशांच्या प्रमुखांनी संबोधित केले आहे. तसेच, येथे गेल्या 75 हून अधिक वर्षांमध्ये 4,000 हून अधिक कायदे या देशासाठी निर्माण करण्यात आले. मुस्लीम महिलांना न्याय देणारा तत्काळ तिहेरी तलाक विरोधी कायदा येथे एकमताने संमत करण्यात आला. गेल्या काही वर्षांमध्ये तृतियपंथीयांना न्याय देणारा कायदा झाला. दिव्यांगांसाठी एकमुखाने कल्याणकारी विधेयके संमत झाली. आता येथून पुढे जायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
अर्थव्यवस्थेची भरारी
गेल्या आठ-नऊ वर्षांमध्ये आम्ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यापर्यंत मजल मारली आहे. आता पुढच्या काही वर्षांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेण्याचा आमचा निर्धार आहे. नव्या आत्मविश्वासासह आणि नव्या जोमाने भारताचा आत्मसन्मान आता पुनर्जागृत झाला आहे. गेल्या 1000 वर्षांमध्ये कधी नव्हती, एवढी उंची आज गाठलेल्या भारतात आम्ही वावरत आहोत, हे आमचे भाग्य आहे. नव्या संसदगृहात आपण भारतीयांच्या या नव्या उत्साहाला साजेशी कामगिरी केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
आत्मनिर्भर होणे आवश्यक
सध्या आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकालात आहोत. पुढील काही वर्षांमध्ये आपल्याला जगात आपले न्यायोचित स्थान मिळवायचे आहे. हे स्थान प्राप्त करायचे असेल तर प्रथम आपल्याला शक्य त्या क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर व्हावे लागेल. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ही राजकारणापलिकडची आवश्यकता आहे. आपल्याला नवनवीत उत्पादने निर्माण करावी लागतील. ती परिपूर्ण आणि निर्दोष असावी लागतील. ती पर्यावरणाची हानी न करता निर्माण करावी लागतील. ‘झीरो डिफेक्ट, झीरो इफेक्ट’ या तत्त्वानुसार काम करावे लागेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
युवकांच्या शक्तीवर विश्वास
युवाशक्ती हे भारताचे सामर्थ्यस्थान आहे. युवकांच्या सृजनशीलतेवर आणि नवनिर्माणाच्या क्षमतांवर आपण अवलंबून आहोत. साऱ्या जगाला आज कुशल आणि प्रवीण युवावर्गाची आवश्यकता आहे. आपण ती आवश्यकता पूर्ण करु शकतो. यासाठी आपल्याला ज्ञान, कल्पकता आणि संशोधन यांच्या आधारावर काम करावे लागणार आहे. सामाजिक न्यायाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्याशिवाय विकास शक्य नाही. सध्या सामाजिक न्यायाची चर्चा फारच संकुचित झाली आहे. तिची व्याप्ती आपण वाढविली पाहिजे. तरच आपण प्रगतीचे शिखर गाठू शकू, अशी मांडणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात केली.
घटनेची प्रत घेऊन प्रवेश…
मध्यवर्ती सभागृहातील भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या राज्यघटनेच्या प्रती हाती धरुन पायी चालत संसदेच्या नूतन वास्तूमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनीही पायी चालत जुन्या संसदेतून नव्या संसदेत प्रवेश केला. या लोकप्रतिनिधींमध्ये प्रामुख्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदसदस्यांचा समावेश होता.
नव्या जोमाते काम करू…
ड नूतन संसदगृहात नव्या उत्साहात काम केले जाण्याचा विश्वास व्यक्त
ड देशाच्या प्रगतीचा विचार राजकारणापलिकडे जाऊन होणे अत्यावश्यक
ड युवाशक्तीच्या सृजनशीलतेवरच आपल्या देशाचे भवितव्य निर्भर आहे
ड प्रगती आणि समृद्धीसाठी आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारणे अत्यावश्यक









