चित्रपटांपासून वेबसीरिजमध्ये स्वत:च्या अभिनयाची कमाल दाखविणाऱ्या मनोज वाजपेयीचा आगामी चित्रपट ‘इन्स्पेक्टर झेंडे’ची घोषणा करण्यात आली आहे. 90 च्या दशकात एका सीरियल किलरला पकडणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका यात तो साकारत आहे. ओटीटी थ्रिलरद्वारे मनोज वाजपेयी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 5 सप्टेंबरपासून पाहता येणार आहे. या चित्रपटात जिम सर्भ हा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या चित्रपटाची कहाणी सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या अटकेवर आधारित असल्याचे समजते.
चार्ल्सला स्वीम सूट आणि बिकिनी किलर देखील म्हटले जात होते. इन्स्पेक्टर झेंडे यांनीच या सीरियल किलरला पकडण्यास महत्त्वाची भूमिका बजावली होती. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. यात मनोज वाजपेयी आणि जिम सर्भ दिसून येत आहेत. ओम राऊत याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शनाचे काम चिन्मय मांडलेकर याने केले आहे.









