मनरेगा कामगारांना मार्गदर्शन : भूजल पातळी वाढण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत सूचना
खानापूर : केंद्रीय जलशक्ती विभागाचे नोडल अधिकारी डी. व्ही. स्वामी आणि केंद्रीय भूजल मंडळाच्या शास्त्रज्ञ डॉ. सुचेतना बिस्वास यांनी शुक्रवारी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन जलसंधारण तसेच ग्राम पंचायतीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या मनरेगा योजनेंतर्गत जलसंधारणासाठी करण्यात आलेल्या कामांची पाहणी करून मनरेगा तसेच जलविद्युत संधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना जलस्त्रोत्र तसेच भूजल पातळी वाढण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत विविध सूचना केल्या. यावेळी ता. पं. चे रवी बंगारेप्पनवर, मनरेगाच्या साहाय्यक संचालिका रुपाली बडकुंद्री, बसवराज एन., जिल्हा साहाय्यक प्रमोद गोडेकर, जिल्हा समन्वयक मौनेश कुमारसह इतर अधिकारी होते. केंद्रीय जलशक्ती आणि भूजल संधारण विभागाच्या अधिकाऱ्यांचा संयुक्त पाहणी दौरा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी खानापूर तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यासंमवेत तालुक्यातील जलसंधारणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कामांची पाहणी केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांनी केली. यात शोषखड्डे, तलावाचे खोलीकरण तसेच वनविभागातील प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेला जलकुंभ यासह इतर जलसंधारण कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.यावेळी रामगुरवाडी आणि शिंदोळी ग्राम पंचायत क्षेत्रातील कामांची पाहणी केली. तसेच मनरेगा कामगारांना पाण्याचे महत्व आणि पाण्याची भूजल पातळी वाढवण्यासंदर्भात शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच पाण्याचे महत्व यासंदर्भात मार्गदर्शन केले. भूजल पातळी वाढवण्यासाठी मनरेगा कामगारानी शासनाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची व्यवस्थित अंमलबजावणी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले.









