कर्मचाऱ्यांशी साधला संवाद : पी. के. क्वॉर्टर्सला भेट
प्रतिनिधी/ बेळगाव
दुसऱ्या शनिवारी सरकारी रजा असतानाही मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शहरामध्ये पहाटे फेरी मारून स्वच्छता कामाची पाहणी केली. स्वच्छता कामगारांशी चर्चा करून शहरातील कचरा उचल संदर्भातील माहिती घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शहरातील कचऱ्याची समस्या दूर करण्याच्यादृष्टीने वेगवेगळ्या उपाययोजना राबवून प्रयोग करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ते स्वत: शहरामध्ये फेरफटका मारून स्वच्छतेची पाहणी करीत आहेत. शनिवारी सरदार्स मैदान येथील बीट कार्यालयाला भेट देऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. बायोमेट्रीक हजेरीची स्वत:हून पाहणी केली. तसेच मनपाच्या गॅरेजला भेट देऊन चालकांची हजेरी पाहिली. त्यानंतर किर्लोस्कर रोड येथील कचरा वेचणाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार मनपा व्याप्तीमध्ये 475 कचरा वेचणाऱ्या युवकांना पालिकेकडून ओळखपत्र देण्यात आले आहे. याबाबत त्यांनी सदर तरुणांशी संवाद साधला. यानंतर ते खासबाग, लेगसी वर्क अॅण्ड ई वेस्ट सेंटरला भेट दिली. तेथील परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना स्वच्छता राखण्यासाठी सूचना केली.
यावेळी कनिष्ठ आरोग्य निरीक्षक शिल्पा कुंभार यांनी मध्यप्रदेश येथील इंदोरच्या धरतीवर सहा वॉर्डांमध्ये कचरा संकलनाचे काम सुरू केले आहे. याची पाहणी आयुक्त दुडगुंटी यांनी केली. इतर वॉर्डांमध्येही याप्रमाणेच कचरा संग्रह करून विल्हेवाट लावण्याची सूचना आरोग्य निरीक्षकांना आणि परिसर अभियंत्यांना केली.
पी. के. क्वॉर्टर्सला भेट
येथील पी के. क्वॉर्टर्स वसतिगृहाला भेट देऊन तेथील मुलभूत सुविधांची पाहणी केली. स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. समस्यांचे त्वरित निराकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर रविवारपेठ, भाजी मार्केट येथे भेट देऊन तेथील स्वच्छता कामाची पाहणी केली. यावेळी मनपा अधिकारी उपस्थित होते.









