ऑडिटसाठी आलेल्या पथकाने पहिल्यांदाच दिली भेट
बेळगाव : केंद्र व राज्य सरकारच्यावतीने महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प तसेच विकासाच्या योजना राबविल्या जातात. केंद्र सरकार निधी देत असल्यामुळे त्याचा लेखाजोखा घेण्यासाठी केंद्रीय पथक बेळगावात दाखल झाले आहे. त्यांनी शुक्रवारी विविध प्रकल्पांना भेटी देऊन राबविण्यात आलेल्या योजनांची पाहणी केली. या कामाबद्दल केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केल आहे. तुरमुरी येथील कचरा डेपो, अजमनगर येथील बायोगॅस प्रकल्प, सदाशिवनगर येथील वाहन गोडावून यासह इतर प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी साहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी यांनी या प्रकल्पांबाबतची माहिती त्यांना दिली. इंदिरा कॅन्टिनचीही यावेळी त्यांनी पाहणी केली. या कॅन्टिनबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. केंद्र सरकार विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देत असतो. त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे झाला की नाही हे पाहण्यासाठी केंद्रीय पथक दरवर्षी बेळगावात येत असते. यावर्षी ते पथक आले असून आता आठ दिवस विकासकामांसाठी केलेल्या खर्चांचा लेखाजोखा तपासणार आहे. याचबरोबर याबाबतचा अहवाल तयार करून तो केंद्र सरकारकडे पाठविणार आहेत. याबाबत केंद्रीय पथकाला विचारले असता आम्ही ऑडिट करण्यासाठी आलो आहे. त्यामुळे याबाबत कोणत्याही प्रतिक्रिया देणार नाही, असे सांगितले.









