प्रतिनिधी /वास्को
राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश कार्बाल यांनी गुरूवारी झुआरी नदीवरील नवीन पुलाची पाहणी केल्यानंतर व उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर काल शुक्रवारी राज्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनीही आपल्या अधिकाऱयांसमवेत या पुलावरील एकूण व्यवस्थेची पाहणी केली व आपल्या अधिकाऱयांना वाहतुकीसंबंधी मार्गदर्शन केले. पहिल्या टप्प्यातील चौपदरी पुलाचे उद्घाटन येत्या गुरूवारी 29 रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. काल शुक्रवारी पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी दक्षिण गोवा वाहुतक पोलीस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर, पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर, दिलीप बिल्डकॉन कंपनीचे अधिकारी व इतरांसमवेत पाहणी केली. जसपाल सिंग यांनी यावेळी पोलीस व दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अधिकाऱयांना आवश्यक सुचनाही केल्या.









