परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचना
बेळगाव : मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विकास करण्यात आलेल्या पार्किंग परिसराची पाहणी करून व्यावसायिकांना स्वच्छता राखण्याची सूचना केली. बुधवारी सायंकाळी मनपा आयुक्तांनी अचानक भेट दिल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या मोकळ्या जागेचा विकास करून वाहन पार्किंगसाठी सोय करण्यात आली आहे. तर न्यायालय व प्रादेशिक आयुक्तांच्या कार्यालयाशेजारी व्यावसायिकांना सोय करून देण्यात आली आहे. वाहन पार्किंगसाठी सोय केल्यामुळे परिसरात होणाऱ्या बेशिस्त पार्किंगला शिस्त लागली आहे. येथे व्यावसायिकांनीही व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी टपऱ्या उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. मनपाकडून या व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली आहे. सदर व्यावसायिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचना केली होती. त्यानुसार परिसर स्वच्छ ठेवला जातो की नाही? याची पाहणी मनपा आयुक्तांकडून करण्यात आली. परिसर स्वच्छ करण्याबरोबरच साठलेला कचरा योग्य ठिकाणी टाकण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली. वेगवेगळे पदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांकडून स्वच्छता ठेवली जात आहे की नाही, याची पाहणीही आयुक्तांनी केली.









